Breaking News

पाण्याच्या पाइपलाइनसाठी खोदलेले रस्ते पूर्ववत करा

खारघर भाजप शिष्टमंडळाची सिडकोकडे मागणी

खारघर : रामप्रहर वृत्त

खारघरमधील पाण्याची समस्या सोडविण्यासाठी भाजप पदाधिकार्‍यांनी सिडकोकडे पाठपुरावा केला. त्यानुसार नवीन पाइपलाइन टाकण्याची कामे झाली, मात्र यासाठी खोदलेले रस्ते तसेच ठेवण्यात आले. त्यामुळे ते रस्ते पूर्ववत करण्यासंदर्भात भाजप खारघरच्या वतीने सिडकोकडे निवेदन देण्यात आले आहे.

खारघर सेक्टर 12 जी टाइपमधील पिण्याच्या पाण्यात मलःनिसारणाच्या पाइपमधील पाणी झिरपत असल्याने वीस दिवसांपेक्षा जास्त दिवस दुषित पाण्याचा पुरवठा होत होता. त्यामुळे अनेक नागरिक विविध आजारांनी ग्रासले होते. हा तांत्रिक दोष सिडको कर्मचार्‍यांना सापडत नव्हता. शेवटी भाजप खारघर शिष्टमंडळाने पाच दिवसांत जर ही समस्या सुटली नाही तर भाजपचे कार्यकर्ते  सिडको कार्यालयासमोर बसून उपोषण करतील अशा इशार्‍याचे पत्र देण्यात आले होते. सुदैवाने चार दिवसांत समस्या सुटली गेली, परंतु या सर्व खटाटोपात आठ ते दहा ठिकाणी खड्डे खणले गेले. सहा महिन्यांपूर्वीच सिडकोच्या मागे लागून या रस्त्याचे डांबरीकरण झाले होते. आता अशा खोदलेल्या रस्त्यांमुळे नागरिकांना व वाहनचालकांना अतोनात त्रास होत आहे.

खारघर मंडल सरचिटणीस दीपक शिंदे यांच्याकडून सिडको अधिकार्‍यांना लवकरात लवकर या रस्त्याची डागडुजी करावी यासंदर्भात सिडकोचे कार्यकारी अभियंता चेतन देवरे यांना पत्र देण्यात आले. या वेळी खारघर मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल, सरचिटणीस दीपक शिंदे व उपाध्यक्ष दिलीप जाधव उपस्थित होते.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply