Breaking News

कोरोनाचा शिरकाव

कोरोना विषाणूची बाधा हा भारतीय जनता पक्षासाठी राजकारणाचा विषय नाही. कोरोनाशी लढा पुकारताना विद्यमान सरकारने कुठलीही कसर न ठेवता प्रामाणिकपणे वैद्यकीय मोहीम चालवावयास हवी. आमचे त्याला समर्थनच राहील असा निर्वाळा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला याची नोंद घ्यायला हवी. कोरोनासारख्या घातक विषाणूशी लढताना आपण एकजुटीने राहायला हवे. गेले काही दिवस ज्याची भीती वाटत होती, ती अखेर खरी ठरली. चीनमध्ये उगम पावलेल्या कोरोना विषाणूचा संसर्ग भारतात नव्हे तर महाराष्ट्रात देखील येऊन पोहोचला आहे. Covid-19 असे शास्त्रीय नाव असलेला हा विषाणू जगभरात 100 हून अधिक देशांमध्ये पोहोचला असून भारत देखील त्यास अपवाद नाही. मुंबई, पुणे, नागपूर अशी आंतरराष्ट्रीय विमानतळे असलेल्या शहरांमध्ये या विषाणूचा फैलाव फार अल्पकाळात होईल अशी भीती व्यक्त केली जात होती. ती सार्थ ठरली. पुण्यामध्ये पाच कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. संपूर्ण देशात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 60 वर पोहोचली असून नजीकच्या काळात यात वाढ होणे अटळ आहे. या विषाणूला घाबरून जाण्याचे कारण नाही. परंतु काळजी मात्र नक्कीच घ्यायला हवी. कोरोना विषाणूबद्दल सोशल मीडियामध्ये उलटसुलट माहिती आणि अफवा यांचा प्रसार होत आहे. त्यातील माहिती कुठली आणि अपप्रचार कुठला हे आपापल्या विवेकबुद्धीने तपासून घ्यायला हवे. उदाहरणार्थ कोरोना विषाणूची बाधा मांसाहारामुळे होते अशी अफवा पसरल्याने एकच घबराट उडाली. आणि काही लोकांनी अंडी व कोंबड्या खाणे बंद केले. त्याचा विपरित परिणाम महाराष्ट्रातील पोल्ट्री उद्योगावर झाला आहे. महाराष्ट्रात काही ठिकाणी तीस रुपये किलो दराने कोंबडी विकली जात आहे. तर कोल्हापूरसारख्या शहरात चिकन लिलाव झाल्याच्या बातम्या असून शंभर रुपयाला चार कोंबड्या या दराने कोंबड्या विकल्या जात होत्या. पालघर येथे काही कुक्कुट पालकांनी तब्बल नऊ लाखाहून अधिक अंडी अणि काही लाख इतकी कोंबडीची पिले खड्यात पुरून नष्ट केली. अंडी आणि कोंबड्यांचे भाव रसातळाला जाऊन देखील लोक कोंबडी खाणे टाळतात हे वास्तव आहे. या अफवेमुळे कुक्कुटपालन व्यवसायाचे शेकडो कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. लोकांमध्ये योग्य माहितीची जागरुकता निर्माण झाली नाही तर नजीकच्या भविष्यकाळात संपूर्ण कुक्कुटपालन व्यवसाय उद्ध्वस्त होईल यात शंका नाही. अंडी व कोंबड्या खाल्ल्यामुळे कोरोनाची बाधा होत नाही हे ठसवून सांगण्यासाठी सरकारने व्यापक मोहीम हाती घेणे गरजेचे आहे. कोरोना विषाणूची बाधा रोखण्यासाठी एन-95 या प्रकारचे विशिष्ट मास्क उपयुक्त ठरतात अशी माहिती पसरल्यानंतर मेडिकल स्टोअर्समधून अनेक प्रकारच्या मास्कची सपाटून विक्री झाली आणि आता तर कुठल्याही प्रकारचा मास्क मिळणे दुरापास्त होऊन बसले आहे. तसेच नकली मास्कची विक्री जोरात होत असून या गैरप्रकारांकडे सरकारने तातडीने लक्ष द्यायला हवे आहे. केरळप्रमाणेच महाराष्ट्रातील काही शाळांनाही काही दिवस सुटी देण्याची मागणी होत आहे. अनेक शाळांमधील स्नेहसंमेलने कोरोनाच्या भीतीमुळे रद्द करण्यात आली आहेत. पर्यटन उद्योगावर देखील कोरोनाच्या भीतीचा भीषण परिणाम जाणवू लागला आहे. पूर्ण दक्षता पाळून एकजुटीने कोरोनाचा पाडाव करणे आपल्याला सहज शक्य आहे हे मात्र खरे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply