Breaking News

…तर मविआ सरकार पाडले असते

रामदास आठवलेंचे संजय राऊतांना उत्तर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

ईडी, सीबीआय, इनकम टॅक्स या यंत्रणांचा वापर करून राज्यातील महाविकास आघाडी सरकार डळमळीत करण्याचा केंद्राचा डाव असल्याचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. राऊत यांच्याकडून सातत्याने याच विषयावर होणार्‍या टीकेला आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी उत्तर दिले आहे. ईडी आणि सीबीआयचा वापर आम्ही करीत नाही असे आठवलेंनी स्पष्ट केलेय तसेच पुढे त्यांनी खरोखर असा वापर करत असतो तर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडले असते, असे म्हटले.

मला वाटते की ईडी किंवा सीबीआयचा वापर आम्ही कोणाला हरवण्यासाठी किंवा पाडण्यासाठी करत नाही. ईडी आणि सीबीआय या स्वतंत्र संस्था आहेत. त्यामध्ये ते सरकारचे किंवा कोणाच्या आदेशावर काम करत नाहीत. यामध्ये सरकारची काहीच भूमिका नाहीय, असे आठवलेंनी म्हटलेय. संजय राऊत यांचे म्हणणे आहे की आम्ही हे सर्व सरकार पाडण्यासाठी करतोय. सरकार पाडण्यासाठी केले असते तर आम्ही प्रत्येक आमदाराची चौकशी केली असती आणि त्यांना आमच्याकडे येण्यासाठी भाग पाडले असते, मात्र असे काही नाहीय, असेही आठवले म्हणालेत.

काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी केलेल्या ट्विटवरुनही आठवलेंना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना बजेटच्या वेळी निर्मला सीतारामन यांच्या मागे मी बसलेलो असतानाचा फोटो पोस्ट करून मी या बजेटवर समाधानी नाही अशा पद्धतीचे ट्विट थरुर यांनी केले होते, असे आठवलेंनी सांगितले. पण त्यांना माहीत नाही की माझा चेहरा असा असला तरी बजेटवर मी किती खूश आहे. माझा असा चेहरा हा आनंदाचा चेहरा होता. तो त्यांना काही कळला नाही. त्यामुळे मी त्यांना त्यांच्या इंग्रजीच्या चुका काढून सांगितले की हे काही बरोबर नाही. त्यांनाही चूक मान्य करीत माझी चूक झाली, असे म्हटल्याचे आठवलेंनी सांगितले.

Check Also

पनवेलमध्ये रविवारी खासदार श्रीरंग बारणे यांचा भव्य नागरी सत्कार

पनवेल ः रामप्रहर वृत्त मावळ लोकसभा मतदारसंघात सलग तीन वेळा विक्रमी मताधिक्याने निवडून आलेले लोकप्रिय …

Leave a Reply