कर्जत : बातमीदार
तालुक्यातील चांदई गावातील शेतकरी माधव कोळंबे हे राजकारणाबरोबरच शेतीत करतात. आनंद मिळतो म्हणून शेती करणारे माधव कोळंबे यांच्याकडे शेतात काम करायला बाहेरून मजूर आणले जात नाहीत. शेतात पिकवलेल्या भुईमूगापासून शेंगदाणा तेल बनविणारे कोळंबे फावल्या वेळेत राजकारणही करतात. आगामी निवडणुकीत आपल्या पक्षाचा एकतरी सदस्य झेडपीमध्ये गेलाच पाहिजे असा चंग त्यांनी बांधला आहे. चिंचवली-कडाव रस्त्यावर चांदइ गावात माधव कोळंबे आपल्या कुटुंबासह गेली अनेक वर्षे शेती करतात. राजनाला कालव्याचे पाणी शेतात आले नसल्याने त्यांनी बोअरिंग पाण्यावर शेती केली आहे. भाजीची मागणी आणि फायदा ज्यावेळी अधिक मिळतो, त्या सिझननुसार त्यांनी भाजीपाला लागवड केली आहे. गतवर्षी लावलेल्या भुईमुगाच्या शेंगापासून त्यांनी तेल तयार केले असून त्या शुद्ध तेलाला 340 लिटर किलो असा भाव मिळाला. त्यांनी आतासर्व प्रकारचे भाजीपाला पीक घेण्यास सुरुवात केली. या हंगामात त्यांनी कोथिंबीर, मेथी, मुळा, गाजर, शेपू, धणे, पालक, कारले, शिराळे, भेंडी, काकडी, दुधी, मका, भोपळा, भुईमूग, टोमॅटो, वांगी यांची शेती केली आहे. सर्व ताजा भाजीपाला ते नेरळ येथे घाऊक व्यापार्यांना नेवून देत असतात. त्यातून त्यांना चांगला फायदा मिळत आहे. माधव कोळंबे यांनी शेती आणि राजकारण यांचे विभाजन करून घेतले आहे. शेतीची कामे उरकली की ते राजकारण करण्यासाठी घराबाहेर पडतात.