Breaking News

फुसका बार

शिवसेनेचे प्रवक्ते आणि नेते संजय राऊत यांनी मोठ्या वाजतगाजत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेचा फुसका बार महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातच नव्हे तर जनतेमध्येही विनोदाचा विषय ठरला आहे. दोन दिवसांपासून ही तथाकथित पत्रकार परिषद माध्यमांमधून गाजवली जात होती. प्रत्यक्षात मात्र अर्वाच्च्य शिव्याशाप आणि कंठाळी डायलॉगबाजी यांच्या पलीकडे या पत्रकार परिषदेतून काहीही हाती लागले नाही.
आपल्या पत्रकार परिषदेतील बॉम्बनंतर भारतीय जनता पक्षाचे साडेतीन नेते कोठडीत जातील आणि सध्या तुरुंगात असलेले अनिल देशमुख बाहेर येतील अशी दर्पोक्ती खुद्द संजय राऊत यांनीच केली होती, मात्र पत्रकार परिषदेतील फुसके आरोप ऐकल्यानंतर हसावे की रडावे हेच कळेनासे झाले. मोठ्या तोर्‍यात शंख फुंकायला जावे तर त्यातून चित्रविचित्र आवाज तेवढे यावेत तसे काहीसे राऊत यांच्या बाबतीत झाले. महाविकास आघाडीतील नेत्यांची अक्षरश: झोप उडवणार्‍या भाजपच्या किरीट सोमय्या यांना अनेक दूषणे देत राऊत यांनी आडवेतिडवे आरोप करण्याचा प्रयत्न केला, परंतु तेदेखील धड जमले नाही. किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या हे राकेश वाधवानशी संबंधित कंपनीचे पार्टनर असल्याचा आरोप राऊत यांनी केला. नील सोमय्या यांच्या निकॉन इन्फ्रा कंपनीने पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यामध्ये माया जमवली असाही त्यांचा जावईशोध ऐकायला मिळाला. भरपूर माया जमवून देणार्‍या बँकेविरुद्ध खुद्द किरीट सोमय्या यांनीच सर्वप्रथम दंड थोेपटले हे कसे झाले, याचे उत्तर राऊत यांनी शोधावे. पीएनबी बँक घोटाळा उघडकीस आणण्याचे संपूर्ण श्रेय सोमय्या यांनाच जाते हे जनता विसरलेली नाही. माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावरदेखील राऊत यांनी फुसका आरोप केला. त्यांच्या मुलीच्या लग्नामध्ये रिसेप्शनच्या वेळी जमिनीवर अंथरलेला गालिचा साडेनऊ कोटी रुपयांचा होता हा राऊत यांनी केलेला आरोप होता की विनोद हे शेवटपर्यंत कळले नाही. शेंडा-बुडखा नसलेले असे अनेक अर्धवट आरोप राऊत यांनी पत्रकार परिषदेत केले. खोदा पहाड निकला चुहा ही हिंदी भाषेमधील म्हण येथे अचूक लागू पडावी. खरे तर खोदा पहाड और चुहा भी नही निकला असेच या पत्रकार परिषदेचे वर्णन करावे लागेल. खासदार राऊत यांचे मानसिक संतुलन ढळले आहे अशी मल्लिनाथी भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी नंतर केली. तीदेखील समाजमाध्यमांवर गाजते आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी राऊत यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असे स्वच्छ शब्दांत सांगून टाकले. राऊत यांना भाजपचे नेते फारसे गांभीर्याने घेत नाहीत, कारण खुद्द त्यांच्या पक्षातच त्यांना कुणी विचारत नाही. त्याचेही स्पष्ट चित्र आजच्या पत्रकार परिषदेत उमटले. एरव्ही खड्यासारखे दूर ठेवण्यात आलेले ज्येष्ठ नेते दिवाकर रावते, अरविंद सावंत आणि अन्य काही नेते तेवढे या परिषदेस उपस्थित राहिले. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोनवरून आशीर्वाद दिल्याचे राऊत यांना जाहीररित्या सांगावे लागले. हा खुलासा त्यांना का करावा लागला याचा शोध त्यांनीच घ्यावा. महाविकास आघाडीचा एकही ज्येष्ठ नेता ना त्यांच्या बाजूला उभा राहिला, ना कुणी त्यांना पाठबळ दिले. एकाकी पडलेल्या मांजराने पंजा मारण्याचा आविर्भाव करावा तशी या पत्रकार परिषदेची गत झाली.

Check Also

राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा शुभारंभ

स्पर्धा प्रमुख परेश ठाकूर यांची जळगाव केंद्रावर उपस्थिती जळगाव ः रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर …

Leave a Reply