केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते आज वॉटर टॅक्सीसेवेचे उद्घाटन
नवी मुंबई : बातमीदार
बेलापूर जेट्टी येथील बहुप्रतिक्षित वॉटर टॅक्सी अखेर नवी मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. केंद्रीय बंदरे व जलवाहतूकमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते या सेवेचे उद्घाटन गुरुवारी (दि. 16) होणार आहे. त्यामुळे बेलापूर ते मुंबई अंतर 25 मिनिटांत नागरिकांना गाठता येणार आहे.
या सोहळ्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार मंदा म्हात्रे, आमदार गणेश नाईक आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, आमदार मंदा म्हात्रे यांनी बुधवारी बेलापूर जेट्टीचा पाहणी दौरा केला. सोबत भाजप जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, प्रभारी संजय उपाध्याय, महामंत्री डॉ. राजेश पाटील, विजय घाटे, दत्ता घंगाळे, श्रीराम घाटे, बाळकृष्ण बंदरे, रवींद्र म्हात्रे, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे अधीक्षक अभियंता सुधीर देवरे, राजीव गायकवाड, प्रवीण पाटील, प्रशांत सानप उपस्थित होते.
बेलापूर जेट्टीवर उपलब्ध सुविधा
- बेलापूरवरून जलमार्गाने मुंबई गाठण्यासाठी वॉटर टॅक्सी
- प्रवाशांसाठी करमणूक म्हणून उद्यान व फुडप्लाझा
- जेट्टीपर्यंत येण्या-जाण्यासाठी चार इलेक्ट्रिक बसची व्यवस्था करण्यात येणार
- प्रशस्त पार्किंग व्यवस्था
- प्रवाशांना बसण्यासाठी आसनव्यवस्था उपलब्ध
- भविष्यात क्रुझचादेखील अनुभव घेता येणार