प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा
महाड : प्रतिनिधी
महाड शहरात गेल्या अनेक वर्षांपासून येणार्या पुरावर राज्य शासनाकडून केल्या जाणार्या उपाययोजनांबाबत दिरंगाई होत असल्याने महाडकर नागरिक आक्रमक झाले असून शुक्रवारी (दि. 4) सकाळी नागरिकांच्या वतीने महाड प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
महाड शहरात सातत्याने पूर येत असल्याने व्यापारी आणि नागरिकांचे मोठे नुकसान होते. सन 2021मध्ये महाड शहरात महापूर आल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले. या महापुरानंतर महाडच्या पूरपरिस्थितीवर उपाययोजना करण्याबाबत शासनदरबारी योग्य पावले उचलली जात नसल्याने आणि केल्या जाणार्या उपायांबाबत पुरेशी यांत्रिक साधने उपलब्ध होत नसल्याने शनिवारी सकाळी महाड पूर निवारण समितीतर्फे उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये शेकडो नागरिकांनी सहभागी झाले होते. संपूर्ण बाजारपेठेतून घोषणा देत हा मोर्चा उपविभागीय कार्यालयावर नेण्यात आला. या समितीकडून महाड बंदचेदेखील आवाहन करण्यात आल्याने शहरातील बहुतांश दुकाने दुपारपर्यंत बंद ठेवण्यात आली होती.
शहरात चौक सभा घेत याबाबत जनजागृती केली जात असून महाडकर नागरिक पूरपरिस्थितीवर आक्रमक झाले आहेत. सद्यस्थितीत सुरु असलेल्या गाळ काढण्याच्या कामाला गती देण्यात यावी आणि पुरेशी यंत्रणा उपलब्ध करून दिली जावी, अशी मागणी या मोर्चादरम्यान करण्यात आली. शहरातील सर्व पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि प्रतिष्ठित नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते. राज्य शासनाने महाडकर नागरिकांच्या भावनांचा विचार करून सुरू असलेल्या कामाला गती दिली नाही, तर पुढील आंदोलन अधिक तीव्र असेल, असा इशारा या वेळी देण्यात आला.