Breaking News

निवडणूक प्रशिक्षणास गैरहजर कर्मचार्यांवर होणार कारवाई

अलिबाग : प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी नेमणूक करण्यात आलेले जे अधिकारी, कर्मचारी प्रशिक्षणास गैरहजर राहिले त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सोमवारी (दि. 30) पत्रकार परिषदेत दिली.

जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदारसंघांत एकूण 2714 मतदान केंद्रांवर 21 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. यासाठी एकूण 13600 कर्मचार्‍यांना मतदान केंद्राध्यक्ष, प्रथम मतदान अधिकारी व इतर मतदान अधिकारी याप्रमाणे जबाबदारी देण्यात आली आहे व त्याप्रमाणे सर्व कर्मचारी यांना आदेश बजाविण्यात आले आहेत. सर्व मतदान कर्मचारी यांचे निवडणूक कामकाजविषयक प्रथम प्रशिक्षण विधानसभा मतदारसंघनिहाय 28 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणासाठी सर्व नियुक्त मतदान कर्मचारी यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते, परंतु एकूण 1277 मतदान कर्मचारी प्रथम प्रशिक्षणास गैरहजर असल्याचे आढळून आले आहे. या 1277 कर्मचार्‍यांना नोटिसा बजावण्यात आल्या असून 1 ऑक्टोबर रोजी विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयात उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. उपस्थित न होणार्‍या नियुक्त कर्मचार्‍यांविरुध्द मा. भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांनुसार व निवडणूक संचालनासंबंधी कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. सूर्यवंशी यांनी दिली.

जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून ठिकठिकाणी तपासणी पथके तैनात केली आहेत. या तपासणी पथकाने अलिबाग, पनवेल, कर्जत, श्रीवर्धन या ठिकाणावरून आतापर्यंत 1 लाख 42 हजार 498 रुपये वाहनांतून जप्त केले असल्याची माहिती जिल्हाधिकार्‍यांनी दिली आहे. जिल्ह्यात 1655 पैकी 192 आर्म्स जप्त करून घेतली आहेत. जिल्ह्यात 14323 राजकीय बॅनर काढण्यात आले असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. सिव्हिजिल अ‍ॅपद्वारे दोन तक्रारी आल्याचे त्यांनी सांगितले. 

केंद्रीय निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील सर्व मतदारसंघांसाठी खर्च निरीक्षकांची नेमणूक केली आहे. त्यांनी जिल्ह्यात येऊन सर्व मतदारसंघांची माहिती घेतली. सर्व अधिकार्‍यांची बैठक घेतली आहे. या बैठकीत उमेदवाराने बँकेत नवे खाते उघडायचे असून त्या खात्यातूनच खर्च करायचा आहे, अशा सूचना निरीक्षकांनी केल्याची माहिती जिल्हाधिकार्‍यांनी दिली. खर्चाची ताळमेळ बैठक श्रीवर्धन 9 ऑक्टोबर, कर्जत उरण, अलिबाग 10 ऑक्टोबर, तर पनवेल, पेण, महाड या विधानसभेची बैठक 11 ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकार्‍यांनी या वेळी दिली.

Check Also

खांदा कॉलनीतील ‘उबाठा’चे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती सुरूच …

Leave a Reply