पनवेल ः रामप्रहर वृत्त
संजय भोपी सोशल क्लब, मॉर्निंग योगा ग्रुप, खांदा कॉलनी बॅटमिंटन क्लब व अलर्ट सिटीझन फोरम खांदा यांच्या संयुक्त विद्यमाने खांदा कॉलनीमध्ये 40 वर्षांवरील क्रिकेटपटूंसाठी संजय भोपी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. 27) झाले. खांदा कॉलनी क्रिकेट असोसिएशनच्या सहकार्याने दरवर्षी खांदा कॉलनीतील 40 वर्षांवरील क्रिकेटपटूंसाठी खांदा कॉलनी प्रीमिअर लीग 40+ ही स्पर्धा भरविण्यात येते. यंदाच्या वर्षापासून ही स्पर्धा नगरसेवक स्व. संजय भोपी यांच्या स्मरणार्थ संजय भोपी प्रीमियर लीग या नावाने खेळविण्यात येणार आहे. स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, भाजप नेते भीमराव पोवार, युवा मोर्चा खांदा कॉलनी अध्यक्ष अभिषेक भोपी, परेश म्हात्रे, आदेश ठाकूर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, क्रिकेटपटू उपस्थित होते.