पनवेल : रामप्रहर वृत्त
ज्येष्ठ निरूपणकार, पद्मश्री डॉ. दत्तात्रेय तथा आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. अध्यात्म, समाजप्रबोधन, सामाजिक कार्य, अंधश्रद्धा निर्मूलन यासाठी केलेल्या कार्याची दखल घेत राज्य सरकारकडून या पुरस्काराची घोषणा करण्यात आली.
ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना वर्ष 2022चा राज्य सरकारचा सर्वोच्च महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. महाराष्ट्र भूषण निवड समितीने केलेल्या शिफारशीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्कामोर्तब केले. रेवदंडा येथे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी आप्पासाहेबांची भेटही घेतली व शाल, श्रीफळ आणि पुष्पहार देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला. या वेळी भाजप जिल्हाध्यक्ष आमदार सर्वश्री प्रशांत ठाकूर, महेश बालदी, भरत गोगावले, महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे, रायगड भूषण डॉ. सचिन धर्माधिकारी, उमेश धर्माधिकारी, राहुल धर्माधिकारी तसेच कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.
14 मे 1946 रोजी जन्मलेले पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी गेली 30 वर्ष निरूपण करीत असून अंधश्रद्धा, बालमनावर संस्कार करण्यासाठी त्यांनी विशेष बालसंस्कार बैठक सुरू केल्या आणि आदिवासी वाडी, वस्त्यांवर व्यसनमुक्तीचे मोठे कार्यही केले.
डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम राबविले जातात. अलीकडच्या काळात संस्थेने सर्वाधिक प्रमाणात वृक्षारोपण केले. याशिवाय वृक्षसंवर्धन, तलाव व स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिराचे आयोजनही नियमितरीत्या करण्यात येते. गणेशोत्सव व नवरात्रेत्सवानंतर निर्माल्यातून खतनिर्मिती करून एक पर्यावरणपूरक संदेशही त्यांनी समाजाला दिला आहे. आप्पासाहेब धर्माधिकारी हे स्वच्छतादूत म्हणूनही ओळखले जातात
रेवदंडा येथे आप्पासाहेबांचे प्राथमिक ते माध्यमिक शिक्षण झाले. बालपणापासून त्यांना कीर्तन, भजन, अध्यात्मिक वाचन याची आवड होती. तळागाळातील प्रत्येक मनुष्यासाठी, समाजाच्या सेवेसाठी आप्पासाहेबांनी आपले आयुष्य वेचले आहे. या कार्याची सुरुवात त्यांचे वडील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांनी 1943 सालापासून केली होती आणि आज तेच कार्य तेवढ्याच जोमाने, तत्परतेने जगभर पोहचविण्याचे कार्य आप्पासाहेब करीत आहेत.
Check Also
दुर्गम भागातील विद्यार्थी सक्षम करण्यासाठी आमची तळमळ -लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्ततळागाळात दुर्गम भागातील विद्यार्थी सक्षमपणे सामोरे जायला पाहिजे ही आमची तळमळ असते, …