Breaking News

एनएमएमटीला कधी मिळणार मुख्य व्यवस्थापक?

नवी मुंबई : प्रतिनिधी

नवी मुंबई परिवहन विभागाच्या परिवहन मुख्य व्यवस्थापक पदावर शासनाचा अधिकारी प्रतिनियुक्तीवर येणे अपेक्षित आहे, परंतु हे पद गेल्या सहा वर्षापासून रिक्त ठेवले गेले आहे. सध्या या पदावर परिवहनमधीलच कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत असणारे शिरीष आरदवाड हे अधिकारी प्रभारी म्हणून काम पाहत आहेत, परंतु शासनाचा अधिकारी यावा म्हणून मनपा प्रशासन कोणतीही हालचाल करत नसल्याचे दिसून येत आहे. याबाबत परिवहन सदस्य आणि मनपा प्रशासन दोघेही चिडीचूप असल्याचे दिसून येते.

नवी मुंबई मनपाच्या परिवहन विभागातील मुख्य व्यवस्थापक हे पद अतिरिक्त जिल्हाधिकारी या संवर्गातील आहे. या पदासाठी शासन आपला अधिकारी प्रतिनियुक्तीवर पाठवत असतो, परंतु हे पद गेल्या सहा वर्षापासून रिक्त असून या पदावर सध्या कार्यकारी अभियंता असणारा अधिकारी कार्यरत आहे. यामुळे साहजिकच एनएमएमटी प्रशासनाचा भोंगळ कारभार जास्तच वाढत चालला असल्याचे दिसून येत आहे. 2013 मध्ये मांगले हे अतिरिक्त जिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी कार्यरत होते. त्यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागेवर कार्यकारी अभियंता असणारे शिरीष आरदवाड यांचा प्रभारी म्हणून मुख्य व्यवस्थापक यांची निवड झाली. शासनाच्या नियमानुसार प्रभारी पदावर साधारणतः सहा महिन्यांच्या कालावधीपेक्षा जास्त वेळ राहता येत नाही, परंतु मुख्य व्यवस्थापकपदी शिरीष आरदवाड यांची सहा वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटला, तरी तेच एनएमएमटीचा गाडा हाकत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

विशेष म्हणजे शिरीष आरदवाड हे उपअभियंता आहेत, परंतु शासनाने कार्यकारी अभियंता हे पद मंजूर केले नसताना सुद्धा त्यांना परिवहन समितीने एक ठराव मंजूर करून कार्यकारी अभियंता हे पद बहाल केले आहे. यावरून परिवहन समिती सदस्य व शिरीष आरदवाड यांच्यात किती जिव्हाळ्याचे  संबंध आहेत हे सिद्ध होत असल्याचे बोलले जाते. याबाबत परिवहन समिती सभापती रामचंद्र दळवी यांना विचारले असता, आम्ही आयुक्तांना पत्र देऊन अतिरिक्त जिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकार्‍यांची मागणी केली आहे आणि हे सर्व आयुक्तांच्याच हातात असल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply