Tuesday , February 7 2023

अलिबाग येथील धरणे आंदोलनावर शिक्षक परिषद ठाम

विविध संघटनांचा पाठिंबा

अलिबाग : प्रतिनिधी

प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर राज्य शासन व रायगड जिल्हा परिषदेचे होत असलेल्या दुर्लक्षाविरोधात शिक्षक परिषद या संघटनेच्या रायगड शाखेच्या वतीने शनिवारी (दि. 21) दुपारी 12 ते 4 या वेळेत अलिबाग येथील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाला विविध शिक्षक संघटनांनी पाठिंबा दिला आहे.

जुनी पेन्शन योजना लागू करावी ही या आंदोलनाची प्रमुख मागणी राहणार आहे. त्याचबरोबर मयत नवीन परिभाषित अंशदान पेन्शन योजना धारकांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपये तातडीने मदत मिळावी, प्रलंबित निवड श्रेणीचे व वरिष्ठ वेतनश्रेणीचे सर्व प्रस्ताव सर्व जिल्हा परिषदांनी निकाली काढावेत, निवडश्रेणीसाठी राज्यभर एकच निकष लागू करावेत, शिक्षकांना मेडिक्लेम योजना लागू करावी, सर्व जिल्हा परिषदांची बिंदू नामावली तातडीने पूर्ण करावी, अशा मागण्याही करण्यात आल्या आहेत. या मागण्यांकडे राज्य शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शिक्षक परिषदेने केला आहे. या धरणे आंदोलनास रायगड जिल्हा केंद्रप्रमुख, पदवीधर संघटना जिल्हा अध्यक्ष संदिप जामकर, रायगड जिल्हा शिक्षक स्वाभिमानी गटाचे नेते  सुभाष भोपी, शिक्षक संघाचे खालापुर तालुका अध्यक्ष उमेश विचारे, रायगड जिल्हा शिक्षक सेना अध्यक्ष निर्भय म्हात्रे, पदोन्नती मुख्याध्यापक संघटनेचे पांडुरंग चौधरी, रायगड जिल्हा जुनी पेन्शन हक्क संघटनेचे जिल्हाध्यक्ष मंदार रसाळ यांनी जाहीर व सक्रिय पाठिंबा दर्शविला आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शिक्षक परिषदेच्या वतीने शनिवारी हे धरणे आंदोलन केले जाणार आहे. या धरणे आंदोलनास रायगड जिल्ह्यातील शिक्षकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन राजेश सुर्वे व संजय निजापकर यांनी केले आहे.

Check Also

भाजप नेते संजय भगत यांच्या वाढदिवसानिमित्त धान्यवाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप माथाडी ट्रान्सपोर्ट व सिक्युरिटी आणि महाराष्ट्र जनरल कामगार संघटना उपाध्यक्ष …

Leave a Reply