भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी विधिमंडळात शिवजयंतीचा मुद्दा उपस्थित केला. शिवसेना पक्षप्रमुखांपासून सर्व जण तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्याच्या मन:स्थितीत असताना सरकारतर्फे अधिकृतरित्या ती तिथीला साजरी का केली जात नाही, असा सवाल त्यांनी केला. त्यांच्या प्रश्नामुळे सत्ताधारी आघाडी पार चक्रावून गेली. याला उत्तर काय द्यायचे? अखेरीस तुमच्या पाच वर्षांच्या सत्ताकाळात तुम्ही शिवजयंती तिथीनुसार साजरी का केली नाही, असा प्रतिसवाल करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शासननिर्णयाचे कारण पुढे केले.
जगातील सर्वांत मोठी लोकशाही म्हणून लौकिक प्राप्त असलेल्या आपल्या भारत देशात कुठल्याही मुद्द्यावर वाद निर्माण होऊ शकतो. वाद नसेल तर तो उकरून काढला जातो किंवा नव्या वादाला जन्म दिला जातो. लोकशाहीचे हे वैशिष्ट्यच आहे. तथापि या वादाला नळावरच्या भांडणाचे स्वरूप येऊ लागले की समाजाची वीण उसवू लागते किंवा समाजा-समाजांमध्ये निष्कारण तणाव निर्माण होतात. अर्थात मतपेटीचे राजकारण ओळखणार्या राजकीय पुढार्यांना असले वाद उपकारकच ठरत असतात. वाद-चर्चेने राष्ट्राची वृद्धी होते हे खरे असले तरी परस्परांच्या श्रद्धास्थानांचा किंवा मतेमतांतरांचा आदर ठेवूनच वाद-चर्चा घडली तरच राष्ट्रउभारणीस पोषक वातावरण निर्माण होऊ शकते. शिवजयंती ग्रेगरियन कॅलेंडरनुसार (इंग्रजी कालमानानुसार) 19 फेब्रुवारी रोजी साजरी करावी की तिथीनुसार फाल्गुन कृष्ण तृतियेस साजरी करावी हा आपल्याकडील जुना वाद आहे. मुळात इतिहासकारांमध्ये हा वाद पूर्वापार चालू आहे. महाराष्ट्र सरकारने मात्र फार पूर्वीच इंग्रजी कालमानानुसार 19 फेब्रुवारी ही तारीख शिवजयंती म्हणून अधिकृत मानली. छत्रपती शिवाजी महाराज हे युगपुरुष होते. त्यांच्या कर्तृत्व आणि पराक्रमाची गाथा सातासमुद्रापार पोहचली. अशा या युगपुरुषाचे पुण्यस्मरण जागतिक पातळीवर व्हावयाचे असेल तर इंग्रजी कालमानानुसार 19 फेब्रुवारी हीच तारीख योग्य आहे असे तेव्हाच्या धोरणकर्त्यांचे मत पडले. त्यात काही अंशी तथ्यदेखील आहे, परंतु शिवछत्रपती हे तर महाराष्ट्राचे दैवत मानले जाते. त्यांना मराठी घराघरांत आणि मनामनांत ईश्वराचे स्थान देण्यात आले आहे. देवदेवतांच्या जयंतीचे दिवस आपण सणासारखे साजरे करतो. हे सण आणि एकूण सर्वच सणवार हिंदु पंचांगाप्रमाणे तिथीनुसार साजरे केले जातात. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस हा तिथीनुसार सणासारखा साजरा व्हावा, अशीही आग्रही मागणी गेली अनेक दशके केली जात आहे. यंदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी तिथीनुसार शिवजयंती झोकात साजरी करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार सोमवारी दादरच्या शिवाजी पार्क येथे मनसेतर्फे ढोल-नगार्यांच्या दणदणाटात शिवजयंतीचा उत्सव साजरा झालादेखील. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून मनोभावे वंदन केले. भारतीय जनता पक्षाच्या अनेक लहानथोर नेत्यांनी आपापल्या मतदारसंघात तसेच मंत्रालयानजिकच्या शिवप्रतिमेचे दर्शन घेतले. खरे तर हा संपूर्ण वादच निरर्थक आहे. छत्रपती शिवरायांच्या पुण्यस्मरणासाठी वर्षाचे 365 दिवस खुले आहेत. या युगपुरुषाचा जन्मदिन तिथीने साजरा करावा की तारखेनुसार या वादापेक्षा त्यांची शिकवण आपल्या अंगी कशी बाणवता येईल याचा विचार होणे सर्वांत इष्ट आहे. दुर्दैवाने राजकारणाच्या खेळातून आपले युगपुरुष आणि थोर विभूती मोकळे सुटत नाहीत हेच खरे.