आंबा पिकावर परिणाम होण्याची शक्यता
मुरूड : प्रतिनिधी
तालुक्यात मागील तीन दिवसापासून ढगाळ वातावरण असून, त्याचा त्रास सर्वाना सहन करावा लागत आहे. या हवामान बदलाचा परिणाम प्रामुख्याने आंबा पिकावर मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर येथील समुद्र शांत असून जोरदार वारेही वाहत नाहीत मात्र गेल्या तीन दिवसांपासून तालुक्यात ढगाळ वातावरण आहे. त्याचा फटका प्रामुख्याने आंबा पिकाला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुरूड तालुक्यात सुमारे 1590 हेक्टर क्षेत्रावर आंबा पिकाचे उत्पादन घेतले जाते. गतवर्षी सुरूवातीला पोषक वातावरण होते. त्यामुळे आंबा उत्पादकांना दिलासा मिळाला होता. यंदा मात्र अवकाळी पाऊस, तापमानातील बदल या कारणांमुळे मोहोर गळती मोठ्या प्रमाणावर झाली आहे. मोहर गळतीमुळे फलधारणा सुमारे 50 ते 60 टक्के कमी झाली आहे.
मुरूड तालुक्यांतील आगरदांडा, सावली, भोईघर, बोर्ली-मांडला, साळाव, वळके, शिरगाव या परिसरात नवनवीन आंबा बागांचे व्यवस्थापन चांगले केले जाते. मात्र ढगाळ वातावरणाचा मोठा फटका आंबा उत्पादकांना सहन करावा लागणार आहे.
ढगाळ वातावरणामुळे तापमान वर-खाली होत असते. अशावेळी आंबा पिकावर बुरशीजन्य रोगाचा प्रभाव होण्याची शक्यता असते. आंबा पिकावर बुरशीजन्य रोगाचा प्रभाव दिसत असल्यास शेतकर्यांनी विशिष्ठ औषधांचा वापर करावा. -व्ही. डी. अहिरे, तालुका कृषी अधिकारी, मुरूड