मुंबई : प्रतिनिधी
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाने तयार केलेला स्वातंत्र्यवीर हा लाईट अँड साऊंड शो शनिवारी (दि. 26) पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. दादरच्या शिवाजी उद्यानासमोरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या दर्शनी भागात दर शनिवार आणि रविवारी रात्री 8 वाजता दाखवण्यात येणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या दर्शनी भागात 66 फूट द 94 फूट इतक्या भव्य पार्श्वभूमी असणार्या भिंतीवर हा कार्यक्रम दाखविला जाणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे क्रांतिकार्य हे तरूण पिढीला स्फूर्तीदायी असून ते तरूण पिढीपर्यंत अशा दिमाखदार आणि नेत्रदीपक स्वरूपात पोहोचविण्याचे काम या शो ने केले आहे. ‘स्वातंत्र्यवीर’ या लाईट अँड साऊंडची शो ची संकल्पना आणि दिग्दर्शन, ‘लोकमान्य- एक युगपुरुष’ या अप्रतिम चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत यांची आहे. तर स्मारकाच्या या अतिशय आगळ्यावेगळ्या, महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर आणि मंजिरी मराठे यांनी पेलली आहे. हा भव्य लाईट अँड साऊंड शो म्हणजे सावरकरांचे क्रांतिकार्य तरूण पिढीपर्यंत पोहोचविणारी एक आधुनिक आणि नेत्रदीपक कलाकृती ठरणार आहे.