नवी मुंबईत दिव्यांगांकरिता आज सत्र
नवी मुंबई : बातमीदार
दिव्यांग मुले व व्यक्ती यांच्याकडे विशेष लक्ष देत महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांगांकरीता सोमवारी (दि. 4) सकाळी 9 ते दुपारी 2 वेळेत सार्वजनिक रुग्णालय वाशी, नेरुळ व ऐरोली याठिकाणी विशेष लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या लसीकरण सत्रात 12 ते 14 वयोगटातील दिव्यांग मुलांना कोर्बेवॅक्स लसीची पहिली मात्रा दिली जाणार आहे. तसेच 15 ते 18 वयोगटातील दिव्यांग मुलांकरिता कोवॅक्सिन लसीची पहिली व दुसरी मात्रा उपलब्ध असणार आहे. त्याचप्रमाणे 18 ते 59 वयोगटातील दिव्यांग नागरिकांकरिता कोवॅक्सिन व कोविशिल्ड लसीची पहिली व दुसरी मात्रा उपलब्ध आहे आणि 60 वर्षांवरील दिव्यांग ज्येष्ठ नागरिकांकरिता कोवॅक्सिन व कोविशिल्ड या दोन्ही लसीची पहिली व दुसरी मात्रा तसेच प्रिकॉशन डोसदेखील उपलब्ध असणार आहे.
पालिकेच्या वतीने सुरुवातीपासूनच कोविड लसीकरण करण्याकडे विशेष लक्ष देण्यात आल्याने प्रभावी रितीने कोव्हीड नियंत्रण करणे शक्य झाले. 18 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाचे दोन्ही डोस 100 टक्के पूर्ण करणारी नवी मुंबई ही राज्यातील पहिली महानगरपालिका ठरली. 15 ते 18 वयोगटातील लसीकरणातही पहिल्या डोसचे 100 टक्के लसीकरण नवी मुंबई महानगरपालिकेनेच पूर्ण केले.
लसीकरण करताना विशेष घटकांकडे प्राधान्याने लक्ष देण्याचे धोरण नवी मुंबई महानगरपालिकेने जपले. त्यामुळे दिव्यांग व्यक्तींप्रमाणेच ज्या व्यक्तींचा सेवा कार्य करताना अधिकाधिक व्यक्तींशी संबंध येतो अशा कोरोना प्रसाराच्या दृष्टीने जोखमीच्या व्यक्तींच्या लसीकरणाकडेही विशेष लक्ष देण्यात आले.
सध्या कोरोनाचे प्रतिबंधात्मक निर्बंध शिथील झाले असले तरी कोविड लसीकरण सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचे असून दुसरा डोस घेणे बाकी असलेल्या नागरिकांनी विहीत वेळेत आपला कोविड लसीचा दुसरा डोस घ्यावा, असे आवाहन विविध माध्यमांतून करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे नुकत्याच सुरू झालेल्या 12 ते 14 वयोगटातील मुलांच्या जलद लसीकरणावरही भर देण्यात येत आहे.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दिव्यांग मुले व व्यक्तींनी या विशेष लसीकरण सत्राचा लाभ घेऊन 4 एप्रिल रोजी आपल्या वयानुसार योग्य लस घ्यावी तसेच दुसरा डोस अथवा प्रिकॉशन डोस घेताना पहिला डोस ज्या लसीचा घेतलेला आहे त्याच लसीचा दुसरा डोस व प्रिकॉशन डोस घ्यावा.
-अभिजित बांगर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका
आजपासून ‘मिशन इंद्रधनुष 4.0’ची दूसरी फेरी
नवी मुंबई : बातमीदार
केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात मार्च 2022 ते मे 2022 या कालावधीत विशेष मिशन इंद्रधनुष 4.0च्या तीन मोहिमांचे नियोजन करण्यात आले आहे. यातील प्रथम फेरी 7 मार्च ते 13 मार्च 2022 मध्ये राबविण्यात आली. या मिशनची दुसरी फेरी 4 एप्रिल 2022 पासून राबविण्यात येत आहे.
बालकांमधील मृत्यू व आजाराचे प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरण हे अतिशय प्रभावी साधन आहे, मात्र अर्धवट लसीकरण झालेली तसेच लसीकरण न झालेली बालके ही पूर्ण लसीकरण झालेल्या बालकांपेक्षा लवकर आजारी पडतात किंवा मृत्यू पावतात असे नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात असे आढळून आले आहे. या मोहिमेमध्ये लसीकरणापासून पूर्णपणे वंचित राहिलेल्या किंवा अर्धवट लसीकरण झालेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांचे लसीकरण पूर्ण करण्यात येणार आहे.
या मोहीमेची पूर्वतयारी करण्याच्या दृष्टीने लसीकरण टास्क फोर्सची विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये इंडियन मेडीकल असोसिएशन, इंडियन असोसिएशन ऑफ पिडियाट्रीक, एकात्मिक बालविकास विभाग यांचे प्रतिनिधी, सर्व रुग्णालयांचे प्रमुख तसेच नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. या सभेमध्ये अपेक्षित लाभार्थ्यांच्या यादीपैकी प्रत्येक लाभार्थ्यावर लक्ष केंद्रीत करून 100 टक्के उद्दिष्टपूर्ती करणेकरीता प्रत्येक वैद्यकीय अधिकारी यांनी विशेष प्रयत्न करावेत, असे सूचित करण्यात आले.
यापूर्वीच या मोहीमेची पहिली फेरी 7 मार्च ते 13 मार्च 2022 या कालावधीत यशस्वीपणे राबविण्यात आली. यामध्ये 65 सत्रांव्दारे 378 गरोदर माता व 1569 बालकांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. या मोहिमेमध्ये एकूण 387 गरोदर मातांना व 1529 बालकांना लसीकरण करण्यात आले. या मोहिमेला नागरीकांचा उत्तम प्रतिसाद लाभला.
शासन निर्देशानुसार या मोहिमेची पुढची दूसरी फेरी 4 ते 11 एप्रिल 2022 या कालावधीत राबविण्यात येत असून यासाठी 64 बाहयसत्रे व पाच मोबाइल अशा एकूण 69 सत्रांचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये 371 गरोदर माता व 1325 बालकांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे व लसीकरणाबाबत संबंधीत सर्व कर्मचार्यांचे पुन्हा प्रशिक्षण घेण्यात आले आहे.
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात नियमित लसीकरणांतर्गत बीसीजी, बी ओपीव्ही, हिपॅटायटीस बी, पेंटाव्हॅलंट, एफ आयपीव्ही, रोटा, गोवर रुबेला, टीडी, डीपीटी, पीसीव्ही या लसी मोफत देण्यात येत असून प्रत्येक इंजेक्शनकरिता नवीन सिरींज व नीडल वापरण्यात येते. तरी सर्व नागरिकांनी विशेष मिशन इंद्रधनुष 4.0 अंतर्गत आपल्या पाच वर्षापर्यंतच्या मुलांना लसीकरण करुन संरक्षित करावे, असे नवी मुंबई मनपा आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितले.