भाजप सरचिटणीस महेश शिंदे यांची मागणी
महाड : प्रतिनिधी
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात असून, या महामार्गाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ’स्वराज्य’ राष्ट्रीय महामार्ग असे नामांतर करावे, अशी मागणी भाजपचे महाड तालुका सरचिटणीस महेश शिंदे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे केली आहे.
कामाच्या अंतिम टप्प्यात असलेला मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 हा कोकणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडकोट किल्ले, समुद्र दुर्ग आणि स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडसह महाराजांच्या समाधीला वंदन करीत असून, या महामार्गाने प्रवास करणार्या प्रत्येक प्रवाशाला स्वराज्याची महती समजावी यासाठी या महामार्गाचे ’स्वराज्य’ राष्ट्रीय महामार्ग असे नामांतर करावे अशी मागणी भाजपचे महाड तालुका सरचिटणीस महेश शिंदे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. याच सोबत त्यांनी महाड-मढेघाट-वेल्हे-पाबेघाट-खानापूर मार्गे पुणे हा मार्ग पर्यटन महामार्ग म्हणून विकसित करावा, अशी मागणीदेखील केली आहे.
महाडमध्ये 22 जुलै 2021 रोजी आलेल्या महापुराचे पाणी पहाता नव्याने रुंदीकरण व काँक्रीटीकरन होणार्या महाड-रायगड मार्गाची उंची वाढणार आहे. लाडवली गावापासून नाते गावापर्यंत या मार्गावरील सिमेंट पाईप मोर्यांऐवजी स्लॅप ड्रेन व छोटे पुल बांधण्यात यावेत असेदेखील शिंदे यांनी यावेळी सुचविले.
या मागण्यांचा योग्य तो पाठपुरावा करण्याचे आश्वासन केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिले.