भाजपचा सर्वसमावेशक जाहीरनामा प्रसिद्ध
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारी (दि. 8) आपला जाहीरनामा प्रकाशित केला. भाजपने त्याला संकल्पपत्र म्हटले असून, याद्वारे ‘संकल्पित भारत, सशक्त भारत’चा निर्धार केला आहे. या जाहीरनाम्यात शेतकर्यांपासून गर्भवती स्त्रियांपर्यंत सर्वांची काळजी घेण्यात आली आहे. सुरक्षा दलाचे सशक्तीकरण करतानाच त्यांना फ्रि हँड देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे, तसेच 60 वर्षांवरील शेतकर्यांना आणि छोट्या व्यापार्यांना पेन्शन देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
काँग्रेसने आपला जाहीरनामा प्रसिद्ध करताना देशातील गरिबी हटवण्यासाठी ‘न्याय योजनेची’ घोषणा केली होती. त्याला उत्तर देताना भाजपने आपले ‘संकल्पपत्र’ जनतेसमोर ठेवले आहे. यासाठी देशभरातून जवळपास 7500 सूचना पेट्या, 300 रथ आणि इलेक्ट्रानिक माध्यमांकडून सूचना मागवल्या होत्या.
या संकल्पपत्राचे प्रकाशन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी भाजप अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री अरुण जेटली, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आदी प्रमुख नेते उपस्थित होते. या जाहीरनाम्यात 75 संकल्पांचा समावेश असून, 2022पर्यंत हे संकल्प पूर्ण करण्याचे आश्वासन त्यातून देण्यात आले आहे.