अलिबाग : प्रतिनिधी
रायगडकरांना चैत्र महिन्यातच वैशाख वणव्याचे चटके सहन करावे लागत आहेत. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 40 अंश सेल्सियसवर पोहचला आहे. उकाड्यामुळे रायगडकर हैराण झाले असून ऊन जरा जास्तच आहे, असे म्हणण्याची वेळ जिल्ह्यातील नागरिकांवर आली आहे.
अलिबाग येथील कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 28 अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. जिल्ह्यातील अलिबाग, मुरूड, श्रीवर्धनसारख्या किनारपट्टी भागात वाड्या असल्यामुळे तापमान कमी आहे. तरी हवेत आर्द्रता वाढल्याने घामाच्या धारांनी अंग भिजून निघते.
एप्रिल-मे हे दोन महिने रखरखीत उन्हाचे म्हणून ओळखले जातात. यंदा मात्र मार्च महिन्याच्या उत्तरार्धात उन्हाची झळ बसू लागली. गेल्या काही दिवसांत त्याची तीव्रता वाढू लागली आहे. पारा 40 अंश सेल्सिअसच्या पार गेल्याने लोक पुरते हैराण झाले आहेत. महाड, कर्जत, खोपोली आणि सुधागड तालुक्यातील तापमान 40 अंशाच्या वर जात असून सकाळी 10 वाजल्यापासूनच उन्हाचे चटके बसायला सुरुवात होते.
अलिबाग वगळता अन्यत्र कुठेही तापमानाची अधिकृत नोंद घेतली जात नसली तरी गुगलवर तपासले असता अनेक ठिकाणी 40 अंश सेल्सिअसच्या जवळपास गेल्याचे पहायला मिळत आहे. महाड, पोलादपूर, माणगाव, खालापूर यांसारख्या भागांत अंगाची लाही लाही होत आहे.
Check Also
सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान
सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …