Breaking News

नाकर्त्या राज्य सरकारविरोधात महाडकर आज महामार्ग रोखणार

पुरापासून मुक्तीसाठी आक्रमक पवित्रा

महाड : प्रतिनिधी
महाड आणि पावसाळ्यातील पूर हे समीकरण ठरलेलेच. दरवर्षी महाडला पुराच्या पाण्याचा फटका बसून नागरिक, व्यापार्‍यांचे नुकसान होते. गेल्या वर्षी तर महाडमध्ये महापूर येऊन हाहाकार उडाला. यानंतर महाडकरांनी आक्रमक पवित्रा घेत सावित्री नदीमधील गाळ काढण्याची मागणी केली होती. त्यानंतर चालू झालेले हे काम आता मात्र निधीअभावी थांबविण्यात आले आहे. त्यामुळे महाडकरांमध्ये प्रचंड संतापाची लाट असून शनिवारी (दि. 30) सायंकाळी रस्त्यावर उतरून महामार्ग बंद करणार आहेत.
जसजसा पावसाळा जवळ येत आहे तशी महाडकरांच्या मनात धडकी भरत आहे. 22 जुलै 2021 रोजी आलेल्या महाप्रलयानंतर महाडकरांनी याची कारणीमिमांसा जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यामध्ये सावित्री नदीतील गाळ व जुटे, दासगाव गोठे येथील कोकण रेल्वेचा भराव आणि धरणे बांधणे ही तीन कारणे प्रामुख्याने पुढे आली. यापैकी सावित्री नदीमधील गाळ काढणे व जुटे काढणे याला प्राधान्य देण्यात आले आणि सोबतच कोकण रेल्वे प्रशासनाशी चर्चा सुरू ठेवण्यात आली, मात्र गाळ काढण्याकडे ठाकरे सरकार लक्ष देत नाहीये हे पाहता महाडकरांना मोर्चा काढावा लागला. सरतेशेवटी गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात झाली. दीड महिना झाला नाही तोच निधीअभावी हे काम बंद करण्यात आले. त्यामुळे संतप्त झालेल्या महाडकरांचा उद्रेक वाढला असून सर्व नागरिकांच्या वतीने शनिवारी सायंकाळी 4 वाजता राज्य सरकारविरोधात महामार्ग रोखून धरला जाणार आहे.
दरम्यान, महाडकरांच्या संतप्त भावना लक्षात घेता एकाही जबाबदार अधिकार्‍याने याविषयी महाड पूर निवारण समितीची भेटसुद्धा घेतलेली नाही. त्यामुळे हे आंदोलन उग्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Check Also

उलवे नोडमध्ये रविवारी महासंस्कृती : जागर स्त्री शक्तीचा सांस्कृतिक कार्यक्रम

भजनी मंडळांना भांडवली अनुदानाचे होणार वाटप पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि …

Leave a Reply