आडिवली-भुतवलीत आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते घरांचे वाटप व कमानीचे उद्घाटन
नवी मुंबई : बातमीदार
आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते शनिवारी (दि. 21) आडिवली-भुतवली गावातील 21 आदिवासी बांधवांना महापालिकेच्या घरकुल योजनेतील घरांचे वाटप करण्यात आले. गावासाठी बांधलेल्या सुंदर कमानीचे उद्घाटनही करण्यात आले. आमदार गणेश नाईक यांच्याच संकल्पनेतून महापालिकेच्या माध्यमातून शहरातील आदिवासींसाठी घरकुल योजना साकारण्यात आली आहे.
या वेळी आमदार गणेश नाईक म्हणाले की; नवी मुंबई ही केवळ कोळी व आगरी बांधवांची मूळ भूमी नसून आदिवासींचीदेखील आहे. त्यामुळे येथील एकही आदिवासी बांधव घरांपासून वंचित राहणार नाही. आदिवासींना सुविधा देताना कायदा आड येता कामा नये. तसे झाले तर कायदा मोडून घरे बांधू. मागील 25 वर्षे नवी मुंबईच्या जनतेने आमच्यावर विश्वास ठेवला असून सुजाण जनतेने चांगल्या लोकांना निवडून दिल्यानेच शहराचा नेत्रदिपक विकास झाला आहे. जनतेचा हा विश्वास यापुढेही कायम राहिल. आमदार नाईक यांच्या सहकार्यामुळेच आडिवली-भुतवलीतीचा विकास झाल्याचे माजी नगरसेवक रमेश डोळे प्रास्ताविकात म्हणाले. आणखी किमान 100 गरीब व गरजू आदिवासी घरांच्या प्रतिक्षेत असल्याचे सांगून त्यांच्यासाठी घरकुल योजना राबविण्याची विनंती केली.
आडिवली-भुतवलीती सारखे आदर्श आदिवासी गाव संपूर्ण ठाणे जिल्ह्यात नसल्याचे माजी नगरसेवक चंद्रकांत पाटील म्हणाले. निवडणुका आल्या की विरोधी पक्षांचे नेते कामाला लागतात. आमच्या नेतृत्वाच्या सुचनेनुसार आम्ही वर्षाचे 365 दिवस, 24 तास कार्यरत असतो असे ते म्हणाले.
माजी महापौर जयवंत सुतार म्हणाले की, आमदार नाईक हेच नवी मुंबईचे शिल्पकार असून आदिवासींसाठी घरकुल योजना त्यांच्याच प्रयत्नांतूनच आकारास आली आहे. माजी नगरसेवक रमेश डोळे यांच्या पाठपुराव्यामुळे आधुनिक शाळा, मैदान, स्वच्छतागृह, पाण्याच्या टाक्या, रस्ते अशा सर्व आवश्यक सुविधा आडिवली-भुतवलीत आहेत. आ. नाईक यांनी आदिवासी बांधवांसाठी महानगर गॅसची जोडणी उपलब्ध करून द्यावी.
शासन स्तरावर आदिवासी बांधवांचे दावे मंजूर होण्यासाठी महापालिकेची वॉर्ड समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल राज्य शासनाकडे जाणे अपेक्षित आहे, मात्र या समितीची बैठकच होत नाही, याकडे माजी नगरसेवक रमेश डोळे यांनी सांगितले.
नवी मुंबईत प्रत्येक विभागात तीन ते चार आदिवासी पाडे
नवी मुंबईत एकुण आठ विभाग असून प्रत्येक विभागात तीन ते चार आदिवासी पाडे आहेत. एकुण 19 आदिवासी पाडे असून सुमारे तीन ते साडेतीन हजारांची आदिवासी वस्ती आहे. आडिवली-भुतवली हे आदिवासींचे सर्वांत मोठे गाव आहे. प्रामुख्याने वारली समाज या ठिकाणी राहतो. पावणे, श्रमिक नगर, खैरणे कातकरी पाडा या पाड्यातील आदिवासींना यापूर्वी घरांचे वाटप करण्यात आले आहे. आडिवली-भुतवली येथील घरे 350 चौरस फुटांची आहेत.
झोपडीवजा खोल्यांमध्ये आम्ही अनेक वर्षे राहत होतो. आता आम्हाला मोठी आणि पक्की घरे मिळाली आहेत. याचा खूप आनंद आहे.
-विनायक वनगा, लाभार्थी