Breaking News

जांभूळपांंड्यातील बंद शाळेत साप; सर्पमित्राकडून जीवदान

पाली : प्रतिनिधी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील साडेतीन महिन्यांपासून शाळांमधूून शिक्षण बंद आहे. अशा बंद वर्गखोल्या, प्रयोगशाळा आणि ग्रंथालयात चक्क सरपटणारे प्राणी वास्तव्यास येत आहेत. सुधागड तालुक्यातील जांभूळपाडा येथील आत्मोन्नती विद्यामंदिरच्या प्रयोगशाळेत एक भली मोठी धामण आढळली. येथीलच कर्मचारी व सर्पमित्र दत्ता सावंत यांनी तिला सुखरूप पकडून जीवदान दिले.

लॉकडाऊननंतर शाळांमध्ये मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचारी काही प्रमाणात येत-जात आहेत, मात्र विद्यार्थी नसल्याने वर्गखोल्या व इतर कक्ष बंद आहेत. त्यातच पावसाळा सुरू झाला. त्यामुळे निवास व भक्ष्य शोधण्यासाठी साप मोठ्या प्रमाणात बंद शाळा व लोकवस्तीत जाताना दिसत आहेत. त्यामुळे आता जेव्हा शाळा इमारती उघडल्या जातील तेव्हा योग्य ती खबरदारी घ्यावी तसेच स्वागताला साप समोर आल्यास घाबरून न जाता जवळच्या सर्पमित्राशी संपर्क करावा, असे असे आवाहन सर्पमित्रांकडून केले जात आहेत. याबाबत सर्पमित्र दत्ता सावंत म्हणाले की, साप हा आपल्या जैवविविधतेतील महत्त्वाचा घटक आहे. शाळेत किंवा घरात साप आढळल्यास घाबरून न जाता व सापाला कोणतीही इजा न करता नजीकच्या सर्पमित्राला बोलवावे, तर शिक्षक वेत्रवान गुरव यांनी सांगितले की, शाळांमध्ये अनेक खोल्या बंद आहेत. जास्त रेलचेल नाही. परिणामी सरपटणार्‍या प्राण्यांचा प्रादुर्भाव असू शकतो. सध्या विद्यार्थ्यांना देण्यासाठी पाठयपुस्तके देखील आली आहेत. ती वितरित करतांना व इतर कामे करताना शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी योग्य खबरदारी व दक्षता घ्यावी.

Check Also

केंद्र सरकार पाच वर्ष टिकेल -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत ः प्रतिनिधी मला या निवडणुकीत खूप काही शिकता आले. विरोधकांनी जाती जातीत तेढ निर्माण …

Leave a Reply