पंचकुला : वृत्तसंस्था
खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत टेबल टेनिसमध्ये मुलींच्या दुहेरीत महाराष्ट्राच्या स्वस्तिका घोष आणि दिया चितळे या जोडीने हरियाणाच्या प्रिथोकी चक्रवर्ती आणि सुहाना सैनी यांना अंतिम सामन्यात हरवून सुवर्णपदक पटकाविले. त्यांनी 14-12, 11-09, 11-6 असे तीन सेट जिंकून ही ‘सुवर्ण’ कामगिरी केली.
पनवेल तालुक्यातील खारघर येथे राहणार्या स्वस्तिकाने लहानपणापासून टेबल टेनिस खेळात आपली आवड व नैपुण्य दाखविले आहे. ती जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयात (स्वायत्त) बीएमएसचे शिक्षण घेत आहे. स्वस्तिकाने देश-विदेशात झालेल्या टेबल टेनिस स्पर्धेत चमकदारी कामगिरी करीत देशाचे नाव उंचाविले आहे.
खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत पहिल्या सेटपासूनच स्वस्तिका आणि दियाने आक्रमक खेळ करीत हरियाणाच्या खेळाडूंना बॅकफूटवर ढकलले. पहिल्या सेटमध्ये महाराष्ट्राचे 14, तर हरियाणाचे 12 गुण होते. दुसरा सेटही
स्वस्तिका आणि दियाने 11-09 असा जिंकला. तिसर्या सेटमध्ये हरियाणाच्या खेळाडूंनी थोडाफार प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, परंतु स्वस्तिका आणि दियाने त्यांचे संरक्षण भेदून काढत तिसरा सेट 11-6 असा जिंकला आणि सुवर्णपदकाला गवसणी घातली. याबद्दल या दोघींचेही अभिनंदन होत आहे.
Check Also
पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध
पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …