आपल्या देशातील सरकारी यंत्रणा जगभरातील सार्या कोरोनासंबंधी घडामोडींचा अंदाज घेत सावधपणे पावले टाकत आहे. जोवर या घातक विषाणूवर प्रभावी औषध वा लस हातात येत नाही तोवर जगभरात सगळ्याच देशांना सुयोग्य खबरदारी राखत टप्प्याटप्प्यानेच जनजीवन खुले करता येणार आहे.
कोरोना संकटाच्या संदर्भातली कुठलीच परिस्थिती ही आजच्या घडीला तरी ठामपणे अंतिम निष्कर्ष काढता येतील अशी नाही. जागतिक स्तरावर असो, राष्ट्रीय पातळीवर वा राज्यात, सगळीकडेच कुठे परिस्थिती काहिशी सुधारताना दिसते, तर दुसरीकडे कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झालेली दिसत आहे. त्यामुळे जिथे-तिथे लोकांकडून परस्परविरोधी मागण्या होताना दिसतात. तसेच अनेक देशांतील सरकारेही गेल्या महिनाभरात लॉकडाऊन शिथिल करणे वा निर्बंध पुन्हा लादणे यातच गुंतलेली आहेत. कोरोनाचे आत्यंतिक भयावह थैमान सुरू असलेली अमेरिकाही याला अपवाद नाही. तिथेही काही लोक लॉकडाऊन उठवण्याची मागणी करीत आहेत, तर अन्य काही अर्थव्यवस्थेकरिता सार्वजनिक आरोग्य धोक्यात आणता येणार नाही, असा पवित्रा घेऊन निदर्शने करीत आहेत. एव्हाना अनेक देश या गोंधळातून गेले आहेत. जपानमधील होक्काईडोचे कोरोनाचे उत्तम नियंत्रण केल्याबद्दल काही काळापूर्वी मोठे कौतुक करण्यात आले होते, परंतु तिथेच कोरोनाच्या प्रादुर्भावाची दुसरी लाट अशी काही परतून आली की तिथे अधिक कठोर निर्बंध लादावे लागले. आपल्याकडे आपण 20 तारखेपासून काही विशिष्ट भागांमध्येच लॉकडाऊनचे निर्बंध काहिसे शिथिल केले. जिथे गेल्या अनेक दिवसांत एकही नवा कोरोनाबाधित सापडलेला नाही वा जिथे मुळातच कोरोनाची एकही केस नव्हती अशा ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्येच लॉकडाऊनपासून काहिशी मोकळीक मिळाली आहे. एकदा मोकळीक मिळाली की सगळे मार्गी लागले असे कुणीही समजू नये, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही बजावले होतेच. या भागांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे नीट पालन न झाल्यास, आरोग्यविषयक पुरेशी खबरदारी घेण्यात हेळसांड होत आहे असे दिसल्यास उठवलेले निर्बंध पुन्हा लादण्यात येतील, हे मोदीजींनी स्पष्ट केले होते. जनतेने हे लक्षात घेऊन जबाबदारीने वागण्याची नितांत आवश्यकता आहे. 20 तारखेला मुंबईच्या रस्त्यांवर ओसंडून वाहिलेली वाहनांची गर्दी हा केवढा बेजबाबदारपणा होता. शहरातील कोरोनासंबंधी परिस्थिती इतकी गंभीर असताना खासगी वाहने घेऊन इतक्या मोठ्या प्रमाणात लोक नेमके कशासाठी बाहेर पडले असावेत? निव्वळ काही विशिष्ट उद्योग क्षेत्रांवरील निर्बंध मागे घेण्यात आले आहेत हे पुरेसे स्पष्ट करण्यात आले होते. अशा बेजबाबदारपणामुळे कोरोना रुग्णांचा कुणाकुणाशी संपर्क आला होता ते शोधण्यात व पर्यायाने फैलाव रोखण्यात निश्चितपणे अडथळे निर्माण होऊ शकतात. त्यामुळेच निव्वळ अन्नधान्य, भाजीपाला, औषधे यांच्या संदर्भातील वाहतुकीसाठीचे नियमच शिथिल करण्यात आले आहेत हे पुन्हा स्पष्ट करणे राज्य सरकारला भाग पडले. निर्बंध शिथिल करताना त्याबद्दल जनतेपर्यंत सुस्पष्टपणे माहिती पोहचवणे अत्यावश्यक आहे, अन्यथा एका दिवसाच्या गर्दीचे परिणाम पुढील अनेक दिवस सगळ्यांनाच भोगावे लागतील. आपल्याकडील बहुसंख्य जनता अल्पशिक्षित आहे. कोरोनासंदर्भात दीर्घकाळ घेण्याची दक्षता त्यांना पुरेपूर कळली आहे वा नाही याची खातरजमा करावी लागेल, अन्यथा पोलिसांचे काम वाढेल. अंतिमत: यातून तुम्हा आम्हालाच फेर लॉकडाऊनचा फटका बसू शकेल हे ध्यानात ठेवले पाहिजे.