स्थानिकांसह पर्यटकही त्रस्त
श्रीवर्धन : प्रतिनिधी
मुसळधार पावसामुळे श्रीवर्धनसह हरिहरेश्वरमधील वीजपुरवठा तब्बल 36 तास खंडित झाला होता. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह पर्यटकांचे हाल झाले.
श्रीवर्धन शहर व परिसरात शुक्रवारी रात्री विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. या वेळी पाभरे वीज उपकेंद्रातून श्रीवर्धनकडे येणार्या मुख्य विद्युत वाहिनीवर विजेचे झोत पडल्यामुळे संपूर्ण म्हसळा ते श्रीवर्धनदरम्यान वीज वाहिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर बिघाड झाला. अनेक ठिकाणी इन्सुलेटर फुटल्यामुळे वीज कर्मचार्यांना प्रत्येक पोल वरती चढून तपासणी करावी लागत होती. शनिवारी रात्री 2च्या सुमारास वीजपुरवठा सुरू झाला, मात्र 20 ते 25 मिनिटांनंतर पुन्हा एकदा पाऊस व विजांचा कडकडाट सुरू झाल्याने वीजपुरवठा खंडित झाला.
शनिवार, रविवार या सुटीच्या दिवशी श्रीवर्धन व हरिहरेश्वर परिसरात पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती. बहुतांश हॉटेल मालकांकडे इन्व्हर्टरची सुविधा उपलब्ध आहे, मात्र 12 ते 15 तासांपेक्षा जास्त काळ इन्वर्टर बॅकअप देऊ शकत नसल्यामुळे बहुतांश हॉटेल अंधारात बुडून गेली. त्यामुळे येथे आलेल्या पर्यटकांमधून मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त करण्यात येत होती.
महावितरणकडून महिन्यातून चार वेळा सकाळी 10 ते सायंकाळी 6 या दरम्यान देखभाली-दुरुस्तीच्या कामासाठी वीजपुरवठा खंडित करण्यात येतो. तरीही त्यानंतर वीजपुरवठा कसा काय खंडित होतो, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
श्रीवर्धन येथील उपकार्यकारी अभियंता महेंद्र वाकपैंजण यांची रत्नागिरी येथे बदली झाल्यानंतर श्रीवर्धनचे हे पद अनेक दिवसांपासून रिक्त आहे. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या मतदारसंघातच महावितरणची ही अवस्था असून याकडे पालकमंत्र्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.