Breaking News

…अन् विद्यार्थी भारावले! कर्जत विद्या विकास मंदिर विद्यालयात दोन वर्षांनी भरली शाळा

कर्जत : प्रतिनिधी

कोरोनाच्या काळात ऑनलाईन शाळा होती. शासन आदेशानुसार आज पहिल्यांदाच  बहुतांश विद्यार्थी शाळेत आले. पहिलाच दिवस असल्याने अनेक शाळांमध्ये सजावट करण्यात आली होती. कर्जत शहरातील महिला मंडळ संचलित विद्या विकास मंदिर विद्यालयात विद्यार्थ्यांच्या पहिल्याच दिवसाच्या शाळा प्रवेशोत्सवाची आगळी वेगळी तयारी केली होती. पालक हे विद्यार्थ्यांना घेऊन उत्स्फूर्तपणे आले होते. दोन वर्षांनंतर विद्यार्थी शाळेची पायरी चढणार होते, त्यामुळे गेल्या तीन-चार दिवसांपासून संस्थेच्या सचिव मीना प्रभावळकर यांनी मुख्याध्यापिका स्नेहा गाढे, श्रद्धा मुंढेकर यांच्यासह शिक्षकांना घेऊन प्रवेशाची तयारी सुरू केली होती. शाळेचा संपूर्ण परिसर रांगोळी काढून सजविला होता. फुग्यांचे प्रवेशद्वार केले होते. बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास पालकवर्ग आपल्या मुलांना घेऊन शाळेत आले. त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांवर फुलांचा वर्षाव करीत मुलांना फुले व खाऊ देऊन त्यांना सन्मानाने शाळेत घेण्यात आले. हा स्वागत समारंभ पाहून पालकही  खूश झाले होते. प्रेम पितळे, मेघा पिंगळे, स्मिता गणवे, आरती कोकरे, माधुरी देशमुख, शारदा चव्हाण, सुषमा सुपे आदी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आपापल्या वर्गात नेले, तेथे त्यांना अल्पोपहार देण्यात आला व पुस्तक वाटपही करण्यात आले. यावेळी विद्यार्थी, शिक्षक व पालकांच्या चेहर्‍यावर आनंद दिसत होता. तालुक्यातील अन्य शाळांमध्ये सुद्धा प्रवेशसोहळा चांगल्या प्रकारे उत्साहात करण्यात आला.

बुधवारी प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्यामुळे एक नवीन उत्साह आला आहे. सेतू अभ्यासक्रमानुसार नवीन वर्गात आलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाईल. तसेच मुलांना जास्तीत जास्त आनंददायी शिक्षण देण्याचा आम्ही प्रयत्न करू.

-स्नेहा गाढे, मुख्याध्यापिका

 

दोन वर्षे ऑनलाइन शाळा होती, परंतु आज आमच्या मुलांना प्रत्यक्ष शाळेत आणण्याचा दिवस उजाडला. त्यामुळे  मी व माझी पहिली व पाचवीतील मुले उत्साही आहोत. शाळेने प्रवेश सोहळासुद्धा चांगला केला.

-रोहिदास देशमुख, पालक

 

माझे यजमानसुद्धा या शाळेचे माजी विद्यार्थी. त्यामुळे माझ्या मुलीचे शिक्षणही या शाळेत व्हावे असे आम्हाला वाटते. दोन वर्षे ऑनलाइन पद्धतीने अभ्यास होता. त्यामुळे मुलांना मोबाईलची सवय लागली होती. आता शाळा प्रत्यक्ष सुरू होत असल्याने मुलांमध्ये मिसळून मुले चांगला अभ्यास करतील याची खात्री आहे.

-प्रियांका कुंदन सुळे, पालक

 

माथेरानमध्ये शाळा प्रवेशोत्सव उत्साहात

कर्जत : माथेरान गिरीस्थान नगर परिषदेच्या वतीने आज प्राथमिक शाळांचा पहिला दिवस शाळा प्रवेश उत्सव म्हणून साजरा करण्यात आला. या निमित्ताने इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेल्या सर्व बालकांचे, गुलाबपुष्प देऊन तसेच पाठ्यपुस्तके आणि खाऊ तसेच मास्क देऊन स्वागत करण्यात आले. नवविद्यार्थ्यांसाठी शाळेचा पहिला दिवस महत्त्वाचा असल्याने तो दिवस उत्सव म्हणून साजरा केला गेल्याने एक चांगला उपक्रम पालिका आणि शाळेच्या वतीने आयोजित केला गेला.अनेक महिन्यांनी पूर्ण क्षमतेने प्राथमिक शाळा सुरू होत असल्याने माथेरानमधील नगर परिषदेच्या वीर भाई कोतवाल प्राथमिक शाळेत सर्वच विद्यार्थ्यांची पहिल्या दिवशी उपस्थिती होती. अतिशय आनंदी वातावरणात, मुलांच्या चेहर्‍यावरील आनंददेखील नजरेत भरणारा होता. या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांसाठी नवनवीन उपक्रम राबविण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागावी म्हणून पालिका ग्रंथालयात विनाफी प्रवेश दिला जाणार आहे. त्या ठिकाणी बाल साहित्य आणि पाठ्यपुस्तक व्यतिरिक्त आवश्यक अशी ग्रंथसंपदा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्याचा पालिकेचा विचार असल्याचे पालिकेच्या मुख्याधिकारी आणि प्रशासक सुरेखा भणगे यांनी यावेळी जाहीर केले. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका पाटील तसेच सर्व शिक्षक आणि लहान मुलांचे पालकदेखील उपस्थित होते.

देगाव येथे शाळा प्रवेशोत्सव उत्साहात

माणगाव : महाराष्ट्र शासनाच्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पनवेल जिल्हा रायगड आयोजित स्टार्स प्रकल्प अंतर्गत माणगाव तालुक्यातील देगाव शाळेचा  शाळा प्रवेशोत्सव बुधवारी (दि. 15) मोठ्या उत्साहात झाला. आकर्षक सजावट आणि उत्साहपूर्ण वातावरणात ढोल-ताशाच्या गजरात, लेझीमच्या तालावर ठेका धरत विद्यार्थ्यांनी दखलपात्र नवागत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत केले. मेळाव्याला खर्‍या अर्थाने सुरुवात झाली. देगाव शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्या   सेजल कदम यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन झाले. प्रथम दीपप्रज्वलन  करून सरस्वतीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. नंतर शाळेत दाखलपात्र विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देवून स्वागत करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक महेश विचारे यांनी शाळा प्रवेशोत्सव विषयी प्रास्ताविकात माहिती दिली. शासनातर्फे दिली जाणारी मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आली. कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांसाठी गोड पदार्थ जिलेबी देवून दिनेश नथुराम गुगले, माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत देगाव यांनी गोडवा आणला. शाळा प्रवेशोत्सव यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक महेश विचारे, पदवीधर शिक्षक शंकर शिंदे, विषय शिक्षक अजित लाड, शा. व्य. स. सदस्या सेजल कदम, समिक्षा दिवेकर  यांनी खूप मेहनत घेतली. आजचा प्रवेशोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply