केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना कृष्णा कोबनाक यांचे निवेदन
माणगाव : प्रतिनिधी
श्रीवर्धन विधानसभा मतदार संघातील विविध विकासकामांसाठी निधी मिळण्याकरिता भाजपचे ज्येष्ठ नेते कृष्णा कोबनाक यांनी शनिवारी (दि. 18) केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची त्यांच्या दालनात भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. या वेळी कोबनाक यांच्या समवेत भाजपचे माणगाव तालुका अध्यक्ष संजयआप्पा ढवळे उपस्थित होते. श्रीवर्धन विधानसभा मतदार संघातील विकासासाठी कृष्णा कोबनाक सातत्याने सक्रिय राहिले आहेत.आपल्या भागातील नागरि समस्या सुटून येथील जनतेला शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील राहिले आहेत. श्रीवर्धन विधानसभा मतदार संघातील विविध प्रश्न सुटावेत आणि येथील विकासकामांसाठी निधी मिळावा यासाठी कोबनाक यांनी नुकताच केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांची त्यांच्या दालनात भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. या वेळी ना. राणे यांनी कोबनाक यांना विकासकामांबाबत सकारात्मक आश्वासन दिले. केंद्रीय मंत्री नारायण राणे हे कोकणाचे सुपुत्र असल्याने ते श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाला न्याय देतील, असा विश्वास कृष्णा कोबनाक यांनी पत्रकारांजवळ व्यक्त केला.