Breaking News

पालीच्या बाजारात मुठ्यांना मागणी वाढली

पाली : रामप्रहर वृत्त

सुधागड तालुक्यात मोसमी पावसाला सुरुवात झाली आहे. अशा वेळी नव्याने बाहेर पडणार्‍या मुठ्यांना (खेकड्याची एक जात) मागणी वाढत आहे.

पहिल्या पावसात उगवलेले कोवळे गवत खाण्यासाठी मुठे बाहेर पडतात. माळराण, शेत, डोंगर, ओहोळ, नदी आणि खाडीच्या किनारी मुठे सापडतात. विशेषत: रात्रीच्या वेळी रिमझिम पावसात मुठे गवत खाण्यासाठी बाहेर पडतात. रात्रीच्या वेळी रिमझिम पाऊस पडू लागल्यानंतर मुठे पकडण्यासाठी अनेक जण बाहेर पडतात. हातात गॅसबत्ती, टॉर्च किंवा जळता टायर घेतला जातो सोबत मुठे ठेवण्यासाठी सिंमेटची पोती किंवा गोणपाट असते.

रात्री माळराण, शेत, गवताळ भाग किंवा डोगरउतारवर फिरुन मुठे पकडले जातात. बत्तीच्या किंवा टॉर्चच्या उजेडात हे मुठे थांबतात मग दबक्या पावलांनी जाऊन त्यांना पकडून पोत्यात टाकले जाते.

मुठे विकून अनेकांच्या हातालादेखील दोन पैसे मिळतात, मात्र अनेक जण मुठे विकत आणण्यापेक्षा पकडणे पसंत करतात. मुंबई, पुणे आदी शहरांमध्ये राहणारे लोक आपल्या गावाकडून हमखास मुठे नेतात किंवा नातेवाईकांना आणायला सांगतात. शहरात 120 ते 100 रुपये डझनावर मुठे मिळतात.

संख्या घटतेय…

वाढते प्रदूषण, शहरीकरण व बांधकामे यामुळे मुठ्यांचा अधिवास नष्ट होत आहे, तसेच पावसाचा अनियमितपणा या कारणांमुळे प्रजोत्पादन कमी होऊन मुठ्यांची संख्या घटत आहे, असे शेतकरी तुषार केळकर यांनी सांगितले.

पावसाळ्यात सापडणारे मुठे चविष्ठ असतात. मुठे खाण्यासाठी पावसाची वाट पाहत असतो. खवय्यांना नेहमीच त्यांचे आकर्षण असते. आवर्जून मुठे खाणे पसंत करते.

-सोनिया माळी, खवय्ये, पाली

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply