हेमंत नगराळे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त
मुंबई ः प्रतिनिधी
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात एपीआय सचिन वाझे यांना अटक करण्यात आल्यानंतर संपूर्ण मुंबई पोलीस दलात खळबळ उडाली. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष भाजपने मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी रान उठविले होते. अखेर वाढत्या दबावानंतर आता थेट मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुंबई पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी आता हेमंत नगराळे यांच्याकडे देण्यात आली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बुधवारी (दि. 17) याबाबतची अधिकृत माहिती दिली.
दरम्यान, रजनीश शेठ यांच्याकडे पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य या पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला असून, संजय पांडे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जबाबदारी देण्यात आल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
सचिन वाझेप्रकरणी चर्चेत आणि पर्यायाने वादात सापडलेले मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची अखेर बदली करण्यात आली आहे. परमबीर सिंग यांची गृहरक्षक दलामध्ये बदली करण्यात आली असून त्यांच्या जागेवर हेमंत नगराळे यांची मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सचिन वाझे प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून परमबीर सिंग यांच्यावर टीका केली जात होती. त्यांच्या बदलीची चर्चादेखील सुरू होती. अखेर राज्य सरकारने त्यांच्या बदलीचे आदेश काढले आहेत.
उद्योगपती अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर सापडलेली स्कॉर्पिओ कार आणि त्यात सापडलेल्या जिलेटिनच्या कांड्या प्रकरणाची चौकशी सुरू असताना कारचा मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाला आणि हे प्रकरण अधिकच वाढले. या प्रकरणामध्ये नंतर मुंबई पोलीस सीआयूचे अधिकारी सचिन वाझे यांचेदेखील नाव समोर आले. सचिन वाझे यांना या प्रकरणी निलंबितही करण्यात आले आहे. एनआयएकडून सचिन वाझेंची सध्या चौकशी सुरू असून यामार्फत या प्रकरणाचा तपास सुरू आहे, मात्र सचिन वाझे थेट ज्यांना रिपोर्ट करीत होते आणि ज्यांच्या जवळचे मानले जातात त्या परबीर सिंग यांच्याकडेदेखील आरोपाची सुई वळू लागली. त्या पार्श्वभूमीवर जबाबदारी निश्चित करण्यासाठी राज्य सरकारकडून हे पाऊल उचलण्यात आल्याचे समजते.
सचिन वाझे प्रकरणात मुंबई पोलीस दलातील काही बडे अधिकारीही अडचणीत येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ज्या वेळी स्फोटकांनी भरलेल्या गाडीचा तपास सचिन वाझे यांच्याकडे होता, त्या वेळी त्यांनी तपासात बरीच गडबड केल्याचा संशय एनआयएला आहे. या सर्व गोष्टी सचिन वाझे यांनी मुंबई क्राइम ब्रँचच्या सर्व वरिष्ठ अधिकार्यांपासून लपवून ठेवल्या होत्या.
ही तर वरवरची मलमपट्टी -चंद्रकांत पाटील
सचिन वाझे यांची पाठराखण करणार्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने आता मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची बदली करून मोठी कारवाई केल्याचा आव आणला असला तरी ही कारवाई म्हणजे वरवरची मलमपट्टी आहे, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. तसेच राजकीय आशीर्वादामुळे एक पोलीस अधिकारी सरकारी यंत्रणा वापरून गुन्हे करीत असल्याचे चित्र निर्माण झाले असून, राज्यातील कायदा-सुव्यवस्था धोक्यात आली आहे. सरकारने या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेतला पाहिजे, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.