ठेकेदारावर कारवाई करा; भाजप कोषाध्यक्ष सनी यादव यांची मागणी
खोपोली ः प्रतिनिधी
पालीफाटा खोपोलीमार्गे पाली रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम एमएसआरडीसीच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे.काही किलोमीटरचे काम पूर्णत्वास गेले असून काही ठिकाणचे काम रखडले आहे, परंतु नूतनीकरणाचे काम करताना पावसाळ्यापूर्वी डांबरीकरण करण्यात आले आहे. हे डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने डांबर उखडून पुन्हा खड्डे पडले असून हे खड्डे अपघाताला कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे हे निकृष्ट दर्जाचे काम करणार्या ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी भाजपचे जिल्हा कोषाध्यक्ष सनी यादव यांनी केली आहे.
खालापूर व पाली-सुधागड तालुक्याला जोडणार्या मुख्य रस्त्याचे नूतनीकरणाचे काम गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. हे काम काही किलोमीटरपर्यंत पूर्ण झाले आहे. काही अंतराचे काम रखडल्याने अनेकांना खड्ड्यांतून प्रवास करावा लागत होता.
पावसाळ्यात या मार्गावरील प्रवास सुखकर व्हावा, यासाठी प्रशासनाने पुढाकार घेऊन या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाची दुरुस्ती करीत डांबरीकरण करण्यात आले आहे, परंतु हे डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे केल्याचे पहिल्याच पावसात समोर आले आहे.
या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे काही ठिकाणी पुन्हा खड्डे पडले असून अपघाताला कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे निकृष्ट दर्जाचे काम करणार्या ठेकेदारावर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी भाजपाचे जिल्हा कोषाध्यक्ष सनी यादव यांनी एमएसआरडीसीच्या वरिष्ठ अधिकार्यांकडे केली आहे.
पालीफाटा (खोपोली)मार्गे पाली रस्त्याचे अनेक ठिकाणी डांबरीकरणाचे काम करण्यात आले आहे, परंतु हे काम निकृष्ट दर्जाचे केलेल प्रथमदर्शनी सिद्ध होत आहे. आताच पावसाळा सुरु झालाय, मात्र आताच हे डांबरीकरण उखडल्याने त्या ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे संबंधित विभागाने ठेकेदारावर कारवाई करावी आणि त्याच पेमेंट थांबवावे. ठेकेदारावर कारवाई न केल्यास भाजपच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
-सनी दशरथ यादव, कोषाध्यक्ष, रायगड जिल्हा, भाजप