कर्जत : बातमीदार
मध्य रेल्वेच्या कर्जत स्थानकात नवीन लोहमार्ग टाकण्यात येत आहे. त्यासाठी भिसेगाव-गुंडगे भागात जाणारा रेल्वेचा पादचारी पूल निकामी करण्यात येणार आहे. दरम्यान, नवीन रेल्वेमार्गामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी मध्य रेल्वेकडून नवीन पादचारी पूल उभारला जात असून त्या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. पुण्याकडे जाणार्या सर्व गाड्या अतिरिक्त इंजिन लावण्यासाठी कर्जत रेल्वे स्थानकात थांबत असतात. त्यामुळे कर्जत रेल्वे स्थानकाला विशेष महत्त्व आहे. या स्थानकात ये-जा करणार्या गाड्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यात पनवेल-कर्जत मार्गावरून दक्षिणेकडे जाणार्या गाड्यांची संख्याही वाढली आहे. त्याचवेळी पनवेल रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे कर्जत स्थानकात फलाट तीनच्या बाजूला नवीन रेल्वे मार्ग टाकण्यासाठी जागा निर्माण करण्यात येत आहे. हे गेल्या काही महिन्यांपासून सुरु आहे. या कामाआड येणारा व भिसेगाव-गुंडगे भागात जाणार्या जुन्या पादचारी पुलाचा भाग तोडावा लागणार आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार आहे, ही अडचण लक्षात घेऊन मध्य रेल्वेने कर्जत स्थानकात पुणे बाजूकडे असलेल्या पादचारी पुलाला आणखी एक जोड पूल उभारला आहे. त्या पुलाचे काम अंतिम टप्प्यात असून हा पूल थेट कर्जत स्थानकाच्या बाहेर उतरणार आहे.