रोहे : प्रतिनिधी
नगर परिषद हद्दीतील सागर डेअरी ते एक्सल कॉलनीपर्यंतच्या रस्त्याची दूरवस्था झाली आहे. रस्त्यावरील खड्डे पावसाच्या पाण्याने भरले आहेत. त्यामुळे वाहने खड्ड्यात आदळत आहेत. त्याचा प्रवासी व वाहनचालकांना त्रास होत असून रोहा नगर परिषदेने किमान खड्डे तरी भरावेत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. रोहा नगर परिषद हद्दीतील सागर डेअरी ते रोहा न्यायालय, एक्सल कॉलनी हा रस्ता पुढे भुवनेश्वरकडे जाण्यासाठी उपयुक्त ठरतो, मात्र या महत्त्वाच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. पावसाळ्यापूर्वी हा रस्ता होणे अपेक्षित होते मात्र या रस्त्याचे काम झाले नाही. खड्डेही भरले गेले नाहीत. पाऊस सुरु झाल्याने हे खड्डे मोठे झाले असून या खड्ड्यांत पावसाचे पाणी साचत आहे. या पाण्यामुळे वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे वाहने खड्ड्यात आदळतात. दुसरीकडे वाहने जवळून गेल्यास खड्ड्यातील पाणी पादचार्यांवर उडत आहे. शहरातील सागर डेअरी ते एक्सल कॉलनी या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता आहे. हे खड्डे भरणे आवश्यक आहे.