Breaking News

रायगडात कडकडीत बंद

अलिबाग ः प्रतिनिधी
कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने रायगड जिल्ह्यात जवळपास सर्व तालुक्यांमध्ये दुकानांचे शटर डाऊन झाल्याचे चित्र शनिवारी (दि. 17) पहावयास मिळाले. काही ठिकाणी जनतेने उत्स्फूर्तपणे बंद पाळणार असल्याचे आधीच जाहीर केले होते, तर अन्य ठिकाणीही स्थानिक पातळीवरील प्रशासकीय, पोलीस यंत्रणेच्या आदेशाने कडकडीत बंद पाळला गेला.  
राज्य शासनाने ब्रेक द चेन अंतर्गत राज्यात संचारबंदी, तसेच कडक निर्बंधांची घोषणा केली आहे. 30 एप्रिलपर्यंत ते लागू राहणार आहेत. त्याची घोषणा करतानाच मुख्यमंत्र्यांनी जिथली तिथली परिस्थिती पाहून स्थानिक प्रशासनाने आवश्यकतेनुसार निर्णय घेण्यास सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर आधी लागू करण्यात आलेला वीकेण्ड लॉकडाऊनचा ट्रेण्ड रायगड जिल्ह्यात पुन्हा पहावयास मिळाला.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर खोपोलीत नगर परिषद, सामाजिक संस्था आणि सर्वपक्षीय नेतेमंडळी यांनी शनिवार ते सोमवार असा तीन दिवसांचा जनता कर्फ्यू जाहीर केला आहे, तर अलिबागमध्ये वीकेण्ड लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आलाय. त्यास अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद लाभला. इतर ठिकाणीही स्थानिक पातळीवरील पोलीस आणि प्रशासनाच्या आदेशान्वये बंद पाळण्यात आला.
बाजारपेठेतील मेडिकल वगळता सर्व दुकाने बंद होती. अगदी काही ठिकाणी दुधाची दुकानेही दुपारनंतर बंद झाली. एसटी बस व ट्रेन वगळता रहदारीची सर्व वाहने बंद होती, पण प्रवासीच नसल्याने बस स्टॅण्ड, रेल्वेस्थानकावरही शुकशुकाट पहावयास मिळाला. त्यामुळे पहिल्या दिवशी सर्वत्र शांतता दिसून आली. दरम्यान, शहर परिसरात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. रविवारीही असेच वातावरण असणार आहे.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply