Breaking News

सायबर चोरट्यांचा धुमाकूळ

पनवेल परिसरात अनेक घटना

पनवेल : वार्ताहर

इंटरनेट आणि तंत्रज्ञानाच्या जगात ऑनलाइन फसवणूक सामान्य झाली आहे. दररोज अशी अनेक प्रकरणे समोर येत आहेत, ज्यामध्ये लोक ऑनलाइन फसवणुकीला बळी पडत आहेत. अशाच काही घटना पनवेल परिसरात घडल्या आहेत. यामध्ये कळंबोलीतील एका विवाहितेला अज्ञात सायबर चोरट्याने 75 हजार रुपयांना गंडा घातला आहे. तर खारघरमध्ये एका व्यक्तीला ऑनलाईन खरेदी चांगलीच महागात पडली आहे. तब्बल चार लाख 10 हजार रुपये या व्यक्तीच्या खात्यातून सायबर चोरट्याने परस्पर वळते केले आहे. वाढत्या डिजिटल व्यवहाराबरोबरच सायबर गुन्हेगार चांगलेच सक्रिय झाले आहेत. त्यामुळे ही सायबर गुन्हेगारी मोडीत काढण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.

पहिल्या घटनेत ऑनलाईन कर्ज घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या कळंबोलीतील एका विवाहितेला अज्ञात सायबर चोरट्याने 75 हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कळंबोली पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात सायबर चोरट्या विरोधात फसवणुकीसह आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.

फसवणूक झालेल्या महिलेने ऑनलाईन कर्ज घेण्यासाठी मोबाइलवर एक अ‍ॅप डाऊनलोड केले होते. त्यावेळी सायबर चोरट्याने दीड लाख रुपये कर्जासाठी पात्र असल्याचा मेसेज पाठवल्याने तिने अ‍ॅपमध्ये सर्व माहिती भरून कस्टमर केअरवर क्लिक केले. त्यामुळे तिच्या मोबाइलवर सायबर चोरट्याचे व्हॉट्सअ‍ॅप सुरू झाले. चोरट्याने विवाहितेसोबत चॅटिंग करून दीड लाख रुपयांच्या कर्जासाठी दहा टक्के सर्व्हिस चार्जेस रक्कम प्रथम भरावी लागेल, असे सांगून तिला एक लिंक पाठवून दिली. विवाहितेने लिंकच्या माध्यमातून गुगल पेवरून 15 हजार रुपये पाठवून दिल्यानंतर कर्ज मंजूर झाल्याचा व रक्कम काढून घेण्याचा मेसेज तिला मिळाला. तिने पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता, सायबर चोरट्याने बँक खाते क्रमांक चुकीचा टाकल्याचे सांगून तो दुरुस्त करण्यासाठी दुसरा मोबाइल नंबर दिला. त्यानुसार विवाहितेने दुसर्‍या मोबाइलवर संपर्क साधला असता, सायबर चोरट्याने खाते क्रमांक दुरुस्त करण्यासाठी 30 हजार रुपये भरावे लागतील, असे सांगितले. विवाहितेने ही रक्कम फोन पे द्वारे भरल्यानंतर तिला कर्ज मंजूर झाल्याचा मसेज आला व अ‍ॅपवर जाऊन रक्कम ट्रान्स्फर करून घेण्यास सांगण्यात आले. विवाहितेने पवर पैसे ट्रान्स्फर करण्याचा प्रयत्न केला, मात्र पैसे ट्रान्स्फर न झाल्याने तिने चोरट्याला विचारणा केली असता. तिचे खाते बोगस असल्याचे सांगून कर्ज मंजुरीसाठी आणखी 41,666 रुपये भरण्यास सांगण्यात आले. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर विवाहितेने प्रथम नवी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडे व त्यानंतर कळंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

दुसर्‍या घटनेत खारघर भागात राहणार्‍या एका व्यक्तीने अर्धा किलो काजू वर अर्धा किलो बदाम मोफत मिळविण्याच्या नादात चार लाख 10 हजार रुपये गमावल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणात फसवणूक झालेल्या व्यक्तीला अज्ञात सायबर चोरट्याने अर्धा किलो काजू वर अर्धा किलो बदाम मोफत देण्याचा बहाणा करुन तक्रारदाराकडून क्रेडीट कार्डची माहिती घेऊन त्याच्या खात्यातून 4 लाख 10 हजार रुपये परस्पर काढून घेतले आहेत. त्यामुळे खारघर पोलिसांनी अज्ञात सायबर चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरू केला आहे.

फसवणूक झालेले शरद बिबवे (वय 49) हे खारघर, सेक्टर- 36 मध्ये राहण्यास असून ते मिनी बस चालवतात. सायबरचोरट्यांनी फसवणूक करण्यासाठी फेसबुकवर टाकलेली अर्धा किलो काजू वर अर्धा किलो बदाम मोफत देण्याची डी-मार्टची जाहिरात त्यांच्या निदर्शनास आली. अर्धा किलो काजू वर अर्धा किलो बदाम मोफत मिळणार असल्याने शरद बिबवे यांनी जाहिरातीवरून अर्धा किलो काजुची ऑर्डर बुक केली. तसेच त्यावर आपल्या क्रेडीट कार्डचा क्रमांक आणि सीव्हीव्ही नंबर टाकला. त्यानंतर ही जाहिरात बनावट असल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यातून बिबवे बाहेर पडले. त्यानंतर दुसर्‍या दिवशी सायबर चोरट्याने डी-मार्टचा प्रतिनिधी असल्याचे भासवून बिबवे यांना संपर्क साधला. तसेच त्यांनी आदल्या दिवशी ऑनलाईन मागवलेले काजू आणि बदाम त्यांना घरपोच मिळतील असे सांगून त्यांच्या व्हॉटस्अ‍ॅपवर एक लिंक पाठवून दिली. तसेच हे अ‍ॅप डाऊनलोड करून पुढील खरेदीसाठीदेखील त्याचा वापर करता येईल, असे सांगितले. त्यामुळे बिबवे यांनी ही लिंक उघडून त्यात आपली सर्व माहिती भरल्यानंतर त्यांच्या क्रेडीट कार्डवरुन 10 हजार रुपये गेल्याचे त्यांना समजले. त्यामुळे बिबवे यांनी तत्काळ बँकेच्या हेल्पलाईनला संपर्क साधून सदर क्रेडीट कार्ड बंद करून घेतले, मात्र तोपर्यंत सायबर चोरट्याने त्यांच्या बँक खात्यातील एकूण चार लाख 10 हजार रुपये काढून घेतले. त्यानंतर बिबवे यांनी खारघर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात सायबर चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरू केला आहे.

Check Also

कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …

Leave a Reply