सूर्य जणू आग ओकत असल्याने राज्यातील सर्व शाळांना उन्हाळी सुट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना उष्माघाताचा त्रास होऊ नये म्हणून राज्य सरकारने ही खबरदारी घेतली आहे. दुसरीकडे पुण्यातील एक शाळा मात्र वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. दहशतवादी कृत्यांमुळे ब्ल्यू बेल्स शाळेवर गंडांतर आले आहे.
दहशतवाद हा आपल्या देशात जुनाच रोग राहिलेला आहे. शेजारी देश विशेषत: पाकिस्तान हा भारताला या ना त्या कारणाने अडचणीत आणण्याची एकही संधी कधी सोडत नाही. अर्थात, उभय देशांमध्ये आता फार मोठा फरक झालेला आहे. अलिकडच्या काही वर्षांमध्ये पाकिस्तानमध्ये कमालीची अराजकता माजली असून हा देश अस्थिर बनला आहे. तिथे लोकशाही, मानवी मूल्ये अक्षरश: पायदळी तुडविली जातात. आता तर त्यांनी तयार केलेले भस्मासूर त्यांच्यावरच उलटले आहेत. दुसरीकडे भारत देश जबरदस्त प्रगती करतोय. विविध क्षेत्रांमध्ये भारताने जागतिक पातळीवर घेतलेली भरारी थक्क करणारी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ आपल्या देशाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले नाही, तर देशवासीयांनाही मान-सन्मान प्राप्त करून दिला आहे, मात्र ही प्रगती बघवत नसल्याने पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना, व्यक्ती नसते उद्योग करून भारतात अराजकता माजविण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात. काश्मीर खोर्यात आपण ते अनेक वर्षे पाहत आलोय. खंबीर केंद्र सरकार व पोलादी गृहमंत्री अमित शाह यांच्यामुळे तिथेही बदल झाला आहे. तरीही कुत्र्याची शेपटी जशी कितीही नळीत टाकली तरी वाकडीच राहते तशी पाकिस्तानची वाईट सवय काही सुटायला तयार नाही. कुत्रा किमान प्रामाणिक असतो. तो ज्याचे खातो त्याच्याशी इमान राखतो, पण भारतातूनच निर्मिती झालेल्या पाकिस्तानने बेईमानी करणे सोडलेले नाही. कालच जम्मू काश्मिरमधील पूंछ जिल्ह्यात लष्कराच्या वाहनावर दहशतवाद्यांनी गे्रनेड हल्ला केल्या. यात पाच जवान शहीद, तर एकजण जखमी झाला आहे. पाकिस्तानमधील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे पाठबळ असलेल्या पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट (पीएएफएफ) संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. एकीकडे अशा प्रकारे हल्ले करून कुरापती काढायच्या आणि दुसरीकडे ‘ब्रेन वॉशिंग’ करून इथेच दहशतवादी घडवून त्यांना भारताविरोधात उभे करायचे असा दुहेरी डाव पाकिस्तान टाकत आहे. पुण्याच्या कोंढवा येथील ब्ल्यू बेल्स शाळेत दहशतवादी बनविण्याचे प्रशिक्षण सुरू असल्याच्या धक्कादायक प्रकाराचा एनआयए म्हणजेच राष्ट्रीय तपास यंत्रणेने पर्दाफाश केला आहे. पीएफआय या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेकडून या ठिकाणी तरुणांना कट्टरपंथीय बनविण्यासाठी तसेच हल्ले करण्याकरिता प्रशिक्षण दिले जात असल्याचा दावा एनआयएने केला आहे. या शाळेचे काही मजले सिल करून चौकशी केल्यानंतर ही शाळाच अनधिकृत असल्याचे उघड झाले आहे. खरेतर शाळा ही ज्ञान देणारी पवित्र वास्तू मानली जाते. तेथून देशाचे भावी आधारस्तंभ घडत असतात, मात्र कोंढव्यातील या शाळेतून देशाला कमकुवत करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. एनआयएने हे कुटील प्रयत्न वेळीच हाणून पाडले. लवकरच यंत्रणा या प्रकरणाच्या मुळापर्यंत जातील तेव्हा आणखी काही गोष्टींवर प्रकाश पडेल.