खारघर : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर-ओवेपेठ येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात मंगळवारी (दि. 5) शालेय विद्यार्थी मंत्रीमंडळ निवडणूक कार्यक्रम उत्साहात झाला.
लोकशाहीमध्ये मतदार हे महत्त्वाची भूमिका बजावतात व योग्य उमेदवार निवडून देतात. आजचे विद्यार्थी हे उद्याचे सुजान नागरीक असतात. त्यांना लोकशाही, निवडणूक, मंत्रीमंडळ, राजकीय पक्ष, नागरिकांची कर्तव्य व राज्य कारभार या सर्वांची माहिती व्हावी व प्रत्यक्ष निवडणूकीचा अनुभव मिळावा या उद्देशाने विद्यालयात विद्यार्थी मंत्री मंडळ निवडणूक घेण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यामधून मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, पोलीस अधिकारी, शिपाई या पदावर विद्यार्थ्यांनी काम केले व स्वत: अनुभव घेतला. या निवडणूकीमध्ये इयत्ता दहावीमधून निशांत वसंत शेळके, इयत्ता नववीमधून पायल मुकेश राठोड व इयत्ता आठवीमधून हिना तौकीर शेख हे वर्गमंत्री म्हणून निवडून आले.
या निवडणूक प्रक्रियेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विद्यालयाच्या मुख्याध्यापिका निशा नायर व मिलन पाटील यांनी काम पाहिले. श्री. जोगदंडे, श्री. खांदेकर व श्री. जाधव यांनी निवडणूक नियोजनाचे काम यशस्वीपणे केले.
संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, अध्यक्ष अरुणशेठ भगत, उपाध्यक्ष वाय. टी. देशमुख, आमदार प्रशांत ठाकूर, सचिव एस. टी. गडदे यांनी निवडून आलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.