Breaking News

मोरबे धरणाच्या पाणी पातळीत वाढ

मागील चार दिवसांतील संततधार पर्जन्यवृष्टीमुळे दिलासा

नवी मुंबई : बातमीदार

स्वत: च्या मालकीच्या मोरबे धरण प्रकल्पामुळे जलसमृध्द शहर अशी नवी मुंबईची ओळख आहे. यावर्षी खूप उशीरा पावसाळी कालावधी सुरू झाल्याने काही शहरांनी पाणी कपातीचा निर्णय घेतला होता, मात्र नवी मुंबई महानगरपालिकेने असा निर्णय न घेता नागरिकांना दिलासा दिला होता. त्याच वेळी इतर शहरातील पाणी टंचाई लक्षात घेता पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहनही महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या वतीने नागरिकांना करण्यात आले होते.

नवी मुंबईकर नागरिकांना पाणी पुरवठा करणार्‍या महानगरपालिकेच्या मोरबे धरण प्रकल्पात 3 तारखेला 27.34 टक्के म्हणजेच 31 ऑगस्टपर्यंत पुरेल इतका जलसाठा होता. 4 जुलैपासून मोरबे धरण पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडण्यास सुरुवात झाल्याने जलसाठ्यात झपाट्याने वाढ झाली. 4 तारखेपासून 8 तारखेपर्यंत पाच दिवसांत 606.80 मि.मि. इतक्या मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टी झाल्याने मोरबे धऱणाच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली असून 52.20 एम.सी.एम. पाणीसाठा चारच दिवसात 70.02 एम.सी.एम. इतका झालेला आहे. म्हणजेच मोरबे धरणातील जलसाठ्यात 17.82 एम.सी.एम. इतकी वाढ झालेली आहे.

संततधार पर्जन्यवृष्टीमुळे जलसाठा 36.68 टक्के इतका झालेला असल्याने चार दिवसात झालेली 9.34 टक्के इतकी लक्षणीय वाढ नवी मुंबईकरांना दिलासा देणारी आहे. सद्यस्थितीत 5 डिसेंबर 2022 पर्यंत पुरेल इतका पाणीसाठा मोरबे धरणात झालेला आहे.

मोरबे धरणाची पाण्याची पातळी 3 जुलै रोजी 69.84 मीटर इतकी होती, ती मागील पाच दिवसातील पावसामुळे 73.10 मीटर इतकी झालेली आहे. 88 मीटर ही मोरबे धरणात पाणी साठविण्याची कमाल क्षमता असून अशाच प्रकारे पाऊस पडल्यास मागील वर्षीप्रमाणेच यावर्षीही मोरबे धरण संपूर्ण भरेल असे दिसून येत आहे.

नवी मुंबई महापालिकेकडून आवाहन

मान्सुनची परिस्थिती लक्षात घेऊन नवी मुंबई महानगरपालिकेने कोणत्याही प्रकारची पाणी कपात केली नाही, मात्र पाण्याचे महत्त्व लक्षात घेऊन सुजाण नवी मुंबईकर नागरिकांनी पाणी जपून वापरावे, पाण्याचा अपव्यय करू नये, असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply