मोहोपाडा : प्रतिनिधी
रसायनी पोलीस स्टेशन हद्दीत आपटा शासकीय आरोग्य केंद्राकडे जाणार्या रस्त्याकडे असलेल्या दर्गा शेजारी आकिब पिट्टू यांचे फार्म हाऊस आहे.येथे त्यांचे बंधू शेळीपालन करतात.
पिट्टू यांनी रविवार दि.10 रोजी सकाळी 7:30 वाजता आपल्याकडील 14 बक-यांना चरायला सोडले.व ईदच्या निमित्ताने नमाज वाचण्यासाठी पिट्टू गेले.यानंतर सकाळी 8 ते 10:00 च्या दरम्यान हिंस्त्र प्राण्यांनी 14 पैकी 9 बकर्यांवर हल्ला करून मृत केले असून 1 बकरी कर्नांला अभयारण्याच्या जंगल दिशेने ओढत नेल्याचे दिसून येत आहे.दुपारी 11 नंतर गावातील तरुणाई या परिसरात फिरायला गेल्यानंतर त्यांच्या सदर प्रकार लक्षात आला.त्यांनी पिट्टू यांना सांगताच त्यांनी रसायनी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास दादाभाऊ डोंगरे यांना सांगितले.यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास डोंगरे यांनी घटनास्थळी भेट देवून वनविभाग व पशुवैद्यकीय अधिका-यांना कळविले.यावेळी दुपारी 1:30 वाजता घटनास्थळी एच.टी.ढाकोल व त्यांच्या पथक तसेच पशुवैद्यकीय अधिका-यांनी भेट दिली. पाहणी केली असता मृत बक-यांवर जंगली कोणत्यातरी हिंस्त्र प्राण्याने हल्ला केल्याने एकूण नऊ बक-या मृतावस्थेत पडल्याचे दिसून आले.तर दहावी एक बकरी बेपत्ता आहे.
कर्नाळा वनपरिमंडळ अधिकारी – एच .टी .ढाकोल यांच्या म्हणण्यानुसार संबंधित परिसर हा कर्नाळा अभयारण्याच्या पायथ्याशी असल्याने कोणत्यातरी हिंस्त्र प्राण्याने हा हल्ला केला असावा असा अंदाज वर्तविला आहे.तर हा तरस जातीचा प्राणी असल्याचा अंदाज वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास डोंगरे यांनी वर्तविला आहे. तसेच हा प्राणी एकटा नसून एकाहून अधिक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.
साधारणत: घटनेच्या आवारातील पाऊलांचे ठसे पाहून तरस किंवा बिबट्यासदृश्य इतर कोणतातरी प्राणी असल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाकडून वर्तविला जात आहे.या प्रकारामुळे आपटा परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.याप्रकरणी पशुधन पर्यवेक्षक आर.बी.चव्हाण अहवाल सादर करणार आहेत.यावेळी वनरक्षक एस.डी.पाटील,अॅड.संजय टेबें, रसायनी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक गोरक्षनाथ बालवडकर आदीसह आपटा ग्रामस्थ उपस्थित होते.