उरण ः वार्ताहर
जेएनपीएतच्या वतीने बंदरात केंद्र सरकारच्या बंदरे, जहाजवाहतूक आणि जलमार्ग मंत्रालयाच्या स्वच्छ सागर, सुरक्षित सागर/स्वच्छ किनारा, सुरक्षित समुद्र उपक्रमांतर्गत उरणनजीकअसलेल्या पिरवाडी सागरी किनारा स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेमध्ये जेएनपीएचे सर्व विभागाध्यक्ष व कर्मचार्यांनी सक्रियपणे सहभाग घेतला. या मोहिमेद्वारे, प्लॅस्टिकच्या वापरामुळे आपले सागरी जीवन कसे नष्ट होत आहे, याविषयी जनजागृती करून जनसामान्यांमध्ये स्वच्छतेसंबंधी वर्तनात्मक बदल घडवून आणणे हा मुख्य हेतू आहे.
याव्यतिरिक्त, जेएन पोर्टने आपले कर्मचारी आणि इतर टर्मिनल्सच्या अधिकार्यांसाठी पर्यावरणासाठी स्वच्छ आणि सुरक्षित समुद्र किनारपट्टीचे महत्त्व पठविण्यासाठी आणि त्यासंबंधी जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रशिक्षण सत्र आयोजित केले होते. अभियानादरम्यान जेएनपीए कर्मचार्यांनी प्लास्टिक कचरा आणि इतर कचर्याचा सागरी जीवनावर होणारा नकारात्मक परिणाम याविषयी सामाजिक संदेश देण्यासाठी व स्वच्छ आणि सुरक्षित समुद्रकिनार्याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी पथनाट्याचे आयोजन केले होते.