Breaking News

दहिवली येथील धाडसी घरफोडी उघडकीस

तीन आरोपी जेरबंद, नऊ लाख 55 हजारांचा मुद्देमाल हस्तगत, रायगडच्या स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

अलिबाग : प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यातील गोरेगाव जवळील दहीवली येथील धाडसी घरफोडीचा गुन्हा रायगड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणला आहे. या प्रकरणी तीन जणांना पोलिसांनी जेरबंद केले असून, त्यांच्याकडून गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत केला आहे.

अलेक्झांडर मरियाराज देवेंद्र (रा. नायगाव, वसई), मकसुद मोहम्मद  मुकादम (रा. भोस्ते, ता. खेड) आणि रहमतुल्ला इब्राहीम डावरे (रा. दहिवली) अशी आरोपींची नावे आहेत. यातील रहमतुल्ला हा ज्या गावात घरफोडी केली, त्याच दहिवली गावचा रहिवासी आहे. या गुन्हयातील 87 टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलीस पथकाला यश आले आहे. आरोपींकडून 287 ग्राम वजनाचे सोन्या-चांदीचे दागिने व दोन हजार 600 रूपये रोख रक्कम मिळून नऊ लाख 55 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. आरोपींनी रायगड जिल्ह्यात अशाच प्रकारचे सहा गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. त्यातील पाच गुन्हे कर्जतमधील आहेत. आरोपींपैकी अलेक्झांडर हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरूध्द मुंबई व रायगडमध्ये नऊ गुन्हे दाखल आहेत. मकसुद विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे.

रायगडचे पोलीस अधीक्षक अशोक दुधे व अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक महेश कदम, सहाय्यक फौजदार देवराम कोरम, राजेश पाटील, यशवंत झेमसे, प्रतिक सावंत, राकेश म्हात्रे तसेच सायबर सेलमधील तुषार घरत, अक्षय पाटील यांनी यात उल्लेखनीय कामगिरी केली.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply