धाटाव : प्रतिनिधी
यंदा पावसाने वेळेवर सुरुवात केली होती. मध्यंतरी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत होता, त्यामुळे बळीराजा धास्तावला होता. मात्र सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाली. सध्या कधी ऊन तर कधी तुरळक पाऊस पडत असल्यामुळे रोहा तालुक्यात आता भात पिकाबरोबर तिळाची सुंदर पिवळी फुले असलेली रोपे डोलू लागली आहेत. रोहे तालुक्यातील सुतारवाडी पंचक्रोशीमधील कुडली, अंबिवली, जावटे, भाले या परिसरामध्ये तिळ, नाचणी, वरी यांची पिके घेतली जातात. सध्या या परिसरात भातासह तिळाची पिके चांगल्या प्रकारे डोलत आहेत. विविध परिसरात भात पिकाला लोंबीधारणा झाली असून आक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात भाताच्या लोंबी पक्व होतील.
पावसाने आता परतीचा प्रवास सुरू केला आहे. त्यामुळे भात पिकांच्या लोब्यां (कणस) लवकरच पक्व होऊन ऑक्टोबरअखेर किंवा नोव्हेंबर महिन्यात पीक कापण्यायोग्य होतील. सध्या भातासह तिळाची पिके डोलत आहेत.
-बाळकृष्ण आयरे, शेतकरी, कुडली, ता. रोहा