Breaking News

कोर्लईत अनेक बोगस बंगले -किरीट सोमय्या

अलिबाग : प्रतिनिधी
मुरूड तालुक्यातील कोर्लई ग्रामपंचायतीमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुटुंबीयांचेच 19 बोगस बंगले आहेत असे नाही. हे प्रकरण 19 बंगल्यांपुरते मर्यादित नाही, तर अनेक बोगस बंगले कोर्लईत सापडणार आहेत. महिनाभरात मोठे प्रकरण बाहेर येईल आणि यात अजून दोन जणांना अटक होईल, असा इशारा भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिला आहे.
मुरूड तालुक्यातील कोेर्लई येथे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आमदार रवींद्र वायकर यांच्या कुटुंबीयांच्या 19 बंगलेप्रकरणी पुढे काय झाले याची माहिती घेण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सोमवारी (दि. 17) कोर्लई येथे भेट दिली. त्यानंतर त्यांनी अलिबाग येथे येऊन जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची भेट घेतली. त्यांच्यासमवेत भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा, दिलीप भोईर, तालुका अध्यक्ष परशुराम म्हात्रे, समीर राणे, अशोक वारगे आदी उपस्थित होते.
कोर्लईतील बोगस बंगले प्रकरणाच्या तपासात रोज नवीन माहिती समोर येत आहे. त्यामुळे महिनाभरात या तपासातून मोठे काहीतरी बाहेर येईल. हे प्रकरण 19 बंगल्यांपुरते मर्यादित नाही. कोर्लई गावात आणखी काही असे बंगले आहेत, ज्यात नियमांना बगल देऊन बांधकामे झाली आहेत. सीआरझेड क्षेत्रातही काही बांधकामे झाल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे ठाकरे आणि वायकर यांच्या कुटुंबीयांच्या बंगल्यांपुरते हे प्रकरण मर्यादित राहिलेले नसून आणखीही काही डझन अशाच प्रकारच्या बोगस बंगल्यांसंबधी कागदपत्रे समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती वाढणार असल्याचा दावा सोमय्या यांनी या वेळी केला.
कोर्लई ग्रामपंचायतीच्या हद्दीत किती घरे आहेत याचा खरा आकडा सांगितला जात नाही. प्रत्यक्षात घरे किती आहेत आणि घरपट्टी किती घरांची वसूल केली जाते याची माहिती मिळत नाही. कोर्लईत आणखी काही लोकांनी बंगले बांधण्याचे उद्योग केले आहेत. त्याची कागदपत्रे माझ्याकडे आली आहेत, असेही सोमय्या यांनी सांगितले.

Check Also

टीआयपीएल रोटरी प्रीमियर लीग उत्साहात

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते बक्षीस वितरण पनवेल ः रामप्रहर वृत्तरोटरी प्रांत 3131मधील …

Leave a Reply