ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष, ग्रामस्थाची जिल्हाधिकार्यांकडे तक्रार
मुरूड : प्रतिनिधी
तालुक्यातील राजपुरी ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यालगत सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. मात्र त्याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार ग्रामस्थ जावेद अब्दुलकरीम हवालदार यांनी जिल्हाधिकारी, मुरुड तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. राजपुरी गाव पर्यटनाच्या दृष्टिकोनातून प्रसिद्ध आहे. ग्रामपंचायतीला वित्त आयोगामधून लाखो रुपये प्राप्त होत असतात, तसेच ग्रामपंचायत करवसुलीही करीत असते, मात्र ग्रामपंचायतीकडे डम्पिंग ग्राउंडची व्यवस्था नाही, कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडी नाही. त्यामुळे मोहल्ल्यातील ग्रामस्थ रस्त्यावरच कचरा टाकत आहेत. हा कचरा कुजून परिसरात दुर्गंधी पसरत असून, ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. राजपुरी ग्रामपंचायतीने सार्वजनिक ठिकाणी टाकण्यात येणार्या कचर्याचे व्यवस्थित व्यवस्थापन केले नाही, तर त्या विरोधात न्यायालयात जाण्याचा इशारासुद्धा जावेद अब्दुलकरीम हवालदार यांनी या निवेदनात दिला आहे. याबाबत राजपुरीच्या सरपंच हिरकणी गिदि यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्या बाहेरगावी असल्याने संपर्क होऊ शकला नाही.