Breaking News

पत्नीच्या प्रेमसंबंधांमुळे पतीची आत्महत्या

पनवेल : वार्ताहर

कामोठ्यातील एका नवविवाहितेने प्रेमसंबंधात अडथळा ठरणार्‍या पतीला प्रियकराच्या मदतीने मानसिक त्रास दिल्याने पतीने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर कामोठे पोलिसांनी नवविवाहिता व तिच्या प्रियकराविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

या घटनेतील मृत पतीचे नाव पलाश रघुवंश बिरेंद्रप्रताप सिंग (वय 31) असे असून तो कामोठेत राहत होता. त्याचा विवाह आग्रा येथे राहणार्‍या आयुशीसोबत झाला होता. तिचे आग्रा येथील अविलकुमार मौर्यासोबत प्रेमसंबंध असताना तिने घरच्यांच्या आग्रहामुळे पलाशसोबत विवाह केला होता. कामोठेत पतीसह राहून ती प्रियकरासोबत फोनवरून चॅटिंग करत होती. ही माहिती पलशला समजल्यानंतर त्याने तिला समजावण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तो तिला आवडत नसल्याचे व त्याच्यासोबत राहणार नसल्याचे तिने सांगितले होते. तिच्या प्रियकरानेही आयुशीसोबत त्याचे संबध कायम राहणार असल्याचे सांगितले होते. तसेच पलाशला जिवे ठार मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर आयुशीने आपल्या प्रेमसंबंधातील अडथळा दूर करण्यासाठी पलाशच्या डोक्यात बियरची बाटली मारून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला होता.

पत्नी व तिच्या प्रियकराकडून सतत मानसिक छळ होत असल्याने पलाशने घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेनंतर पलाशच्या वडिलांनी कामोठे पोलिसांकडे आयुशी व तिचा प्रियकर अवीलकुमार मौर्या या दोघांविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा प्राथमिक तपास करून या दोघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Check Also

उरणमधील ‘उबाठा’, शेकापचे कार्यकर्ते भाजपमध्ये

आमदार महेश बालदी यांच्याकडून स्वागत उरण : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना उद्धव बाळासाहेब …

Leave a Reply