खारघर : प्रतिनिधी
आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनाच्या निमित्ताने सामाजिक दृष्टिकोनातून खारघर सेक्टर 4 मधील निरामय हॉस्पिटल व सेक्टर 12 मधील संजीवनी हॉस्पिटल येथे परिचरिकांचा मिठाई व गुलाबपुष्प देऊन कौतुक व सत्कार करण्यात आला. या वेळी पनवेल महानगरपालिकेचे नवनिर्वाचित प्रभाग समिती (अ) सभापती शत्रुघ्न काकडे, नगरसेवक रामजी गेला बेरा, खारघर सरचिटणीस दीपक शिंदे, युवा चिटणीस अजय माळी, महिला मोर्चा उपाध्यक्ष अनिता जाधव, अभिजित काटकर
उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजय माळी यांनी केले, तर परिचारिकांविषयी मत व्यक्त करताना दीपक शिंदे यांनी नर्सेसचे समाजाच्या प्रति आरोग्य क्षेत्रातील समर्पण भावना व अहोरात्र रुग्णांची सेवा करीत असल्याबद्दल कौतुक केले व निरामय आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या. सभापती शत्रुघ्न काकडे व नगरसेवक रामजी बेरा यांनी सर्वांचा मिठाई व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. त्या वेळी अनेक परिचारिका भावुक झाल्या होत्या. अशा प्रकारे आमच्या कामाची कदर केली जात नसल्याची भावना व्यक्त केली. सभापती शत्रुघ्न काकडे व नगरसेवक रामजी बेरा यांनी निरामय हॉस्पिटलचे डॉ. अमित व अंजना थडानी, तसेच संजीवनी हॉस्पिटलचे डॉ. मनीषकुमार यांचे सहकार्याबद्दल आभार मानले.