पनवेल ः प्रतिनिधी
कडाक्याचे तापमान, असह्य उकाडा, तीव्र पाणीटंचाईने सर्वत्र हाहाकार माजवला असतानाही तालुक्यात सर्वत्र लगीनसराईचा धूमधडाका सुरूच आहे. यामुळे पाणीटंचाई आणि उकाड्यातही वधूवर पित्यांना आपल्या मुलामुलींचे विवाह पार पाडण्यासाठी मेहनत घ्यावी लागत आहे. यंदा पाणीटंचाई व तापमानाने सर्व उच्चांक मोडले आहेत.
पनवेलमधील तापमान जवळपास 40 अंशांपर्यंत पोहचले आहे. त्यामुळे अंगाची लाही लाही होत आहे, तसेच तालुक्यातील शेकडो गावपाड्यांत तीव्र पाणीटंचाईने हाहाकार उडाला आहे. ग्रामीण भागासह शहरी भागातही पाणीटंचाईचे थैमान सुरू आहे. या जलसंकटाची तमा न बाळगता जनताजनार्दन उत्साहाने लग्नसोहळ्यात सहभागी होत आहेत. मध्यान्ही डोक्यावरील सूर्य आग ओकत असतानाही बँडच्या तालावर बेधुंदपणे नाचणार्या तरुणाईच्या उत्साहात कोणतीच कमतरता जाणवत नाही. अनेक लग्न एकाच वेळी असल्यामुळे मंगल कार्यालये, कॅटरर्स, शामियाना, बँड पार्टी, भटजी, हारविक्रेते, घोडेवाले, पागोटे-पगडीवाले या सगळ्यांचीच धावपळ उडत आहे. याशिवाय बाजारपेठा व सराफा बाजारातही तेजीचे वातावरण असून बाजारपेठा ग्राहकांनी हाऊसफुल्ल झाल्या आहेत. सगळीकडे उसनवार करून लग्न समारंभ साजरे करण्याची चुरस आहे. असह्य तापमान व पाणीटंचाईचाही लग्नसोहळ्याच्या उत्साहावर परिणाम झाला नसल्याचे दिसून येत आहे.
शहरात लग्नसराईची चांगलीच धूमधाम सुरू आहे, मात्र वाढत्या उन्हाच्या झळांचा त्रास वर्हाडी मंडळींना सहन करावा लागत आहे. उन्हाचे चटके टाळण्यासाठी वर्हाडी वृक्षांच्या सावलीचा आधार घेताना दिसत आहेत, मात्र शहरात झाडांची कमतरता असल्याने वर्हाडी चांगलेच भाजून निघत आहेत. मे महिन्यात लग्नाचे खूपच मुहूर्त आहेत. यामुळे मंगल कार्यालये व लॉन्स वर्हाडी मंडळींनी फुल्ल झाले आहेत. त्यातच मे महिना म्हटल्यावर कडक उन्हाच्या झळा सर्वांनाच सहन कराव्या लागतात. पनवेल शहर, जिल्ह्यातदेखील लग्नाच्या ऐन मोसमात वर्हाडी मंडळींना कडक उन्हाचा त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी लग्नात आलेली वर्हाडी मंडळी पाहुणचार घेत उन्हापासून बचावासाठी मिळेल त्या ठिकाणी वृक्षांच्या सावलीचा आधार घेताना दिसत आहेत.
कितीही कडक ऊन असले तरी लग्नाची निमंत्रणे टाळता येत नाहीत. नातेवाईकांच्या आग्रहाखातर लग्नाला यावेच लागते. उन्हात भाजत, घामाघूम होत वर्हाडी मंडळी वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी लग्नाला हजेरी लावतातच.