Breaking News

लॅबचालकासह बोगस एमडी पॅथॉलॉजिस्टला अटक

पनवेल : वार्ताहर

एमडी पॅथॉलॉजिस्ट डॉक्टर नसलेल्या व्यक्तीच्या नावाने रुग्णांच्या रक्त व इतर तपासण्या करून त्याबाबतचे रिपोर्ट देणार्‍या नवीन पनवेलमधील सिद्धकला कॉम्प्युटराईज्ड पॅथॉलॉजी लॅबवर खांदेश्वर पोलिसांनी कारवाई केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात लॅबचालक आणि बोगस एमडी पॅथॉलॉजिस्ट डॉक्टर या दोघांना अटक केली. गत मार्च महिन्यामध्ये पोलिसांनी सदर लॅबवर कारवाई केली होती.

नवीन पनवेलमधील सिद्धकला कॉम्प्युटराईज्ड पॅथालॉजी लॅबचालकाकडून एमडी पॅथॉलॉजिस्ट डॉक्टर नसलेल्या राजेंद्र निकम या व्यक्तीच्या नावाने रक्त व इतर तपासण्या करून त्याच्याच सहीने रिपोर्ट दिले जात हेते. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अ‍ॅण्ड मायक्रोबायोलॉजिस्ट या संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी गत जानेवारी महिन्यामध्ये सिद्धकला लॅबमध्ये बोगस रुग्णांना पाठवून विविध तपासण्या करून घेतल्या होत्या. या सर्व तपासणी रिपोर्टवर राजेंद्र निकम या व्यक्तीच्या एमडी पॅथ नावाने सह्या असल्याचे आढळून आले. त्यामुळे पॅथॉलॉजिस्टच्या संघटनेने या व्यक्तीबाबत अधिक माहिती घेतली असता, राजेंद्र निकम नाव असलेली कोणतीही व्यक्ती एमडी पॅथ नसल्याचे, तसेच नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक नसल्याचे आढळून आले. त्यानुसार पोलिसांनी सिद्धकला कॉम्प्युटराईज्ड पॅथॉलॉजी लॅबवर गुन्हा दाखल करून सदरची लॅब बंद करण्याची कारवाई केली होती. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून सदर लॅबच्या चालक यांना गत आठवड्यात अटक केली. त्यानंतर पोलिसांनी राजेंद्र निकम याला अटक केली. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी ठोठावल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव रोंगे यांनी दिली. दरम्यान, या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या राजेंद्र निकम याने डॉ. निरज दुबे या डॉक्टरच्या रजिस्ट्रेशन नंबरचा वापर करून बनावट एमडी पॅथॉलॉजिस्ट असल्याबाबतचे बनावट प्रमाणपत्र तयार केले होते.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply