नवी मुंबई पालिका आयुक्तांकडून विभागवार आढावा
नवी मुंबई : बातमीदार
महापालिकेमार्फत सुरू असलेली कामे विहित वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे व त्याचा सातत्याने पाठपुरावा करून अपेक्षित कालावधीत नागरिकांना सुविधा उपलब्ध होतील याकडे बारकाईने लक्ष द्यावे, असे निर्देश महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी विभागप्रमुखांना आढावा बैठकीवेळी दिले. या वेळी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले व संजय काकडे आणि विभागप्रमुख उपस्थित होते.
महापालिकेच्या विविध विभागांचा आढावा घेताना आयुक्तांनी प्रत्येक विभागामार्फत तत्परतेने करावयाच्या कामांचा तसेच नियोजित कामांची सविस्तर माहिती घेतली. महानगरपालिका रुग्णालयांमध्ये आवश्यक औषध उपलब्धतेबाबतच्या कार्यवाहीचा आढावा आयुक्तांनी घेतला व ही कार्यवाही तत्परतेने करण्याचे निर्देशित केले. कोविड केंद्रातील बेड्स व इतर साहित्य पुनर्वापरात आणण्याबाबत शासकीय स्तरावर पत्रव्यवहार करून पाठपुरावा करावा, असेही निर्देश आयुक्तांनी दिले. झोपडपट्टी तेथे ग्रंथालय ही संकल्पना कार्यान्वित होण्याच्या दृष्टीने तत्पर कार्यवाही करावी व डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ती कार्यान्वित होण्याकडे बारकाईने लक्ष द्यावे असेही आयुक्तांनी निर्देशित केले. मार्केटच्या वास्तू वापरात आणण्याच्या दृष्टीने ओटले वाटपाची कार्यवाही लवकरात लवकर करून घ्यावी तसेच फेरीवाला धोरण अंमलात आणून उचित कार्यवाही करण्यासाठी पाठपुरावा करावा, असेही परवाना विभागास सूचित करण्यात आले.घणसोली येथील बांधकाम सुरू असलेल्या नागरी आरोग्य केंद्राचे काम या महिना अखेरपर्यंत पूर्ण करून त्याठिकाणी नागरी आरोग्य केंद्र सुरू करण्याची कार्यवाही तत्परतेने करावी, अशाही सूचना अभियांत्रिकी व आरोग्य विभागास आयुक्तांनी दिल्या. सिडकोने दिव्यांग स्टॉल्ससाठी उपलब्ध करून दिलेल्या प्लॉटवर लवकरात लवकर दिव्यांग सन्मान किऑक्स बसवून ते वापरात येतील याबाबतची कार्यवाही गतीमानतेने करण्याचेनिर्देश आयुक्तांनी या वेळी दिले. दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी जागा व स्टॉल उपलब्ध करून देण्याबाबतची सोडत उत्तम रितीने पारदर्शक पध्दतीने पार पडली असून स्टॉल धारकांना लवकरात लवकर प्रत्यक्ष व्यवसाय सुरु करता येईल यादृष्टीने तत्पर कार्यवाही करण्याचे आयुक्तांमार्फत सूचित करण्यात आले.नवी मुंबई महापालिकेची मंगल कार्यालये सुव्यवस्थित रितीने सुरू असून सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या लग्न व इतर समारंभासाठी लाभदायक ठरत आहेत. त्या अनुषंगाने आगामी लग्नसराईचा कालावधी लक्षात घेऊन त्याठिकाणी आवश्यक दुरुस्तीची कामे तातडीने करून घ्यावीत, असे निर्देशित करतानाच आयुक्तांनी विभाग अधिकारी यांनी आपापल्या क्षेत्रातील मंगल कार्यालयांची पाहणी करून त्यामधील आवश्यक गोष्टींचा अहवाल विभाग प्रमुखांकडे सादर करावा व विभागप्रमुखांनी ती कामे प्राधान्याने संबंधित विभागांकडून करून घ्यावीत, असेही निर्देश आयुक्तांनी या वेळी दिले. नवी मुंबई महापालिका सर्वच क्षेत्रात आघाडीवर असल्याने आपल्याकडून जनतेच्या व शासनाच्या मोठ्या अपेक्षा असून त्या दृष्टीने प्रत्येक काम गुणवत्तापूर्ण होईल याकडे काटेकोर लक्ष देण्याचे निर्देश या वेळी आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सर्व विभाग प्रमुखांना दिले.
Check Also
कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा
कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …