महाड : प्रतिनिधी
ऐतिहासिक महाड क्रांतीभूमीत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 66व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मंगळवारी (दि. 6) नागरिकांनी अभिवादन केले. सकाळपासूनच चवदार तळे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापुढे नतमस्तक होण्यासाठी भीमसैनिकांनी गर्दी केली होती. त्याचप्रमाणे शहरातील विविध ठिकाणी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड चवदार तळे येथे सामाजिक क्रांती केली. या क्रांतीभूमीत महापरिनिर्वाणदिनी तालुक्यातील भीमसैनिक आणि विविध क्षेत्रातील नागरिक, पदाधिकारी, नेत्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली. महाडमधील पंचशीलनगर, भीमनगर आणि इतर विभागात असलेल्या भीम अनुयायांनी सोमवारी मध्यरात्री चवदार तळे येथे मेणबत्ती प्रज्वलित करून आदरांजली वाहिली. मंगळवारी शहरातील अनेक राजकीय, धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रातील पदाधिकार्यांनी चवदार तळे येथे येवून बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी आमदार भरत गोगावले, काँग्रेस नेते हनुमंत जगताप, वंचित बहुजन आघाडीचे रवींद्र चव्हाण, रिपब्लिकन पार्टीचे केशव हाटे, मोहन खांबे, लक्ष्मण जाधव, बौद्धजन पंचायत समितीचे सखाराम जाधव, संतोष हाटे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक येथे अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी बी. आर.आडे यांनी उपस्थित समाजबांधवाना मार्गदर्शन केले. बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने अशोक जाधव, बाळू सकपाळ, कुंदन हाटे, अशोक साळवी आदि पदाधिकार्यानी डॉ. बाबासाहेब यांना आदरांजली वाहिली. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, भारतीय बौद्ध महासभा, बौद्धजन पंचायत समिती, वंचित बहुजन आघाडी, आदी राजकीय चळवळीतील पुढारी अभिवादन करण्यास उपस्थित होते. महाडमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, विविध शासकीय कार्यालये आणि महाड एसटी.आगार या ठिकाणी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्र बहुजन सेनेच्या वतीनेदेखील अभिवादन करण्यात आले. महाड आणि परिसरातील भीम ज्योतीदेखील या वेळी शहरात दाखल झाल्या होत्या. दलितमित्र खांबे गुरुजी ट्रस्ट आणि बौद्धजन पंचायत समिती शाखा 55 यांच्या वतीने 1063 मेणबत्त्या प्रज्वलित केल्या गेल्या. संपूर्ण चवदारतळे येथे मेणबत्त्या प्रकाशित करण्यात आल्या. कोळोसे येथील महिलांनी माता रमाईचे गाव वणंद येथून भीमज्योत प्रज्वलित करून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे गाव आंबडवे मार्गे महाड येथे आणली. या वेळी कोळोसे येथील महिला मंडळ आणि आदर्श तरुण मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Check Also
आमदार महेश बालदी यांचा विविध वाड्यांमध्ये प्रचार
पनवेल : रामप्रहर वृत्त उरण विधानसभा प्रचार सभा प्रमुख प्रवीण काळबागे, माजी जि.प.सदस्य ज्ञानेश्वर घरत …