Breaking News

देशाचे भविष्य घडविणे आपल्याच हातात

पेण येथील कार्यक्रमा वीरमाता अनुराधा गोरे यांचे युवकांना मार्गदर्शन

पेण : प्रतिनिधी

स्वातंत्रपूर्व काळापासून भारतमातेसाठी हजारो जणांनी बलिदान दिले, आपले सर्वस्व पणाला लावले. आज त्यांच्या बलिदानामुळेच आपण इथे सुरक्षित आहोत. त्यांच्या त्यागाची आपण सर्वांनी सतत जाण ठेवायला हवी. आपल्याला आपल्या देशाचे भविष्य घडविण्याची संधी मिळत आहे. हे भविष्य घडविणे, आपल्याच हातात आहे, असे युवा-युवतींना प्रेरित करणारे वक्तव्य वीरमाता अनुराधा विष्णू गोरे यांनी युवा दिनाच्या सांगता समारंभ निमित्ताने येथे केले. भाग्यलक्ष्मी हॉल येथे नेहरू युवा केंद्र रायगड, जिल्हा माहिती कार्यालय, रुरल यंग फाऊंडेशन रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी विवेकानंद युवा सप्ताहानिमित्त शहीद कॅप्टन विनायक गोरे यांच्या मातोश्री वीरमाता अनुराधा विष्णू गोरे यांच्या देशाचे भविष्य तुमच्या हाती या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर वीरमाता अनुराधा गोरे यांच्या शालेय माजी विद्यार्थिनी असलेल्या मेजर डॉ. आश्लेषा तावडे, नेहरू युवा केंद्र रायगड चे जिल्हा समन्वयक निशांत रौतेला, जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, रूरल यंग फाउंडेशनचे संस्थापक सुशील साईकर, अध्यक्ष कमलेश ठाकूर,  विद्या पाटील हे मान्यवर उपस्थित होते. सैन्यदलात जायचे असेल तर अभिमानाने जा. स्वतःवर विश्वास असेल तरच देशसेवा घडेल. तिथे स्व-हितापेक्षा देशहितालाच प्राधान्य द्या. आपला देश, आपली मातृभूमी, आपले आईवडील, गुरू यांना कधीही विसरू नका, त्यांना कधीही अंतर देऊ नका, या शब्दात वीरमाता अनुराधा गोरे यांनी उपस्थित युवक-युवतींना प्रेरित करून भारतीय सैन्याने विविध युद्धात केलेल्या पराक्रम आणि बलिदानाविषयीच्याही आठवणी विविध युद्ध प्रसंग सांगून जागविल्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीस भारतमाता, स्वामी विवेकानंद आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या  प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला. प्रास्ताविक सुशील साईकर, सूत्रसंचालन प्रवीण म्हात्रे, यांनी केले तर आभार घन:श्याम गायकवाड यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता श्रुती बोन्द्रे यांच्या सुमधुर आवाजातील संपूर्ण वंदे मातरमने करण्यात आली.

युवकांनी देशहिताला प्रधान्य द्यावे : मनोज सानप

युवकांनी स्वतःशी प्रामाणिक राहून समाजहित व देशहिताला प्राधान्य द्यावे. देशसेवा करण्यासाठी विविध  सेवामार्ग खुले आहेत, त्यासाठी जिद्दीने अभ्यास करा, आत्मविश्वासाने, पूर्ण तयारीने विविध स्पर्धात्मक परीक्षांना सामोरे जा, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी उपस्थित युवा-युवतींना केले.

Check Also

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …

Leave a Reply